तो त्यांच्याबरोबर हे बोलत असताना पाहा, कोणीएक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, “माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे, तरी आपण येऊन आपला हात तिच्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल.”
तेव्हा येशू उठला व त्याच्यामागे आपल्या शिष्यांसह जाऊ लागला.
मग पाहा, बारा वर्षे रक्तस्रावाने पिडलेली एक स्त्री त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली.
कारण ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन.”
तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली.
मग येशू त्या अधिकार्याच्या घरात जाऊन पावा वाजवणार्यांना व गलबला करणार्या लोकसमुदायाला पाहून म्हणू लागला,
“वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्याला हसू लागले.
मग लोकसमुदायाला बाहेर लावून दिल्यावर आत जाऊन त्याने मुलीच्या हाताला धरले आणि ती उठली.
हे वर्तमान त्या अवघ्या देशात पसरले.
मग येशू तेथून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्यामागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, “अहो दावीदपुत्र, आमच्यावर दया करा.”
तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले; तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “हे करण्यास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता काय?” ते त्याला म्हणाले, “होय, प्रभू.”
तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हटले, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हांला प्राप्त होवो.”
तेव्हा त्यांना दृष्टी आली; मग येशूने त्यांना निक्षून सांगितले की, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.”
तरी ते तेथून निघून गेल्यावर त्या अवघ्या देशात त्यांनी त्याची कीर्ती गाजवली.
मग ते तेथून जात असताना, पाहा, एका मुक्या भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले.
त्याने भूत काढल्यावर त्या मुक्याला वाचा आली; तेव्हा लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “इस्राएलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते.”
परंतु परूशी म्हणू लागले, “हा भुतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भुते काढतो.”
नंतर येशू त्यांच्या सभास्थानांत शिकवत, राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करत सर्व नगरांतून व गावांतून फिरत होता.
तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ ते गांजलेले व पांगलेले होते.
तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत;
ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.”