YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 9:1-13

मत्तय 9:1-13 MARVBSI

तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास जाऊन पोहचला. मग पाहा, बाजेवर पडून असलेल्या कोणाएका पक्षाघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले, तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, धीर धर; तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” मग पाहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, “हा दुर्भाषण करतो.” येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता? कारण ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे’ असे बोलणे, किंवा ‘उठून चाल’ असे बोलणे, ह्यांतून कोणते सोपे? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हांला समजावे म्हणून (मग तो पक्षाघाती मनुष्याला म्हणाला) ऊठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा.” मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोकसमुदाय भयचकित झाले आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला. मग तेथून जाताना येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, “माझ्यामागे ये.” तेव्हा तो उठून त्याच्यामागे गेला. नंतर असे झाले की, तो घरात बसला असता, पाहा, बरेच जकातदार व पापी लोक येऊन येशू व त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस जेवायला बसले. हे पाहून परूशी त्याच्या शिष्यांना म्हणाले, “तुमचा गुरू जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?” हे ऐकून तो म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणाइतांना आहे. ‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’ ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका; कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना पश्‍चात्तापासाठी बोलावण्यास मी आलो आहे.”