YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 27:32-46

मत्तय 27:32-46 MARVBSI

ते बाहेर जात असता शिमोन नावाचा कोणीएक कुरेनेकर मनुष्य त्यांना आढळला; त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरले. मग गुलगुथा नावाची जागा, म्हणजे कवटीची जागा, येथे येऊन पोचल्यावर त्यांनी त्याला ‘पित्तमिश्रित द्राक्षारस पिण्यास दिला,’ परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना. त्याला वधस्तंभावर खिळल्यावर ‘त्यांनी चिठ्ठ्या टाकून’ त्याची ‘वस्त्रे वाटून घेतली;’ [जे संदेष्ट्याने सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले; ते असे की, ‘त्यांनी माझी वस्त्रे वाटून घेतली व माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या’]. नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करत राहिले. त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लावला; तो असा : “हा यहूद्यांचा राजा येशू आहे.” त्या वेळी त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक त्याच्या उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. आणि जवळून जाणारेयेणारे ‘डोकी डोलवत’ त्याची अशी निंदा करत होते की, “अरे, मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणार्‍या, तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर.” तसेच मुख्य याजकही, शास्त्री व वडील ह्यांच्याबरोबरीने थट्टा करत म्हणाले, “त्याने दुसर्‍यांना वाचवले; त्याला स्वतःला वाचवता येत नाही; तो इस्राएलाचा राजा आहे; त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. ‘तो देवावर भरवसा ठेवतो; तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला’ आता ‘सोडवावे’; कारण मी देवाचा पुत्र आहे, असे तो म्हणत असे.” जे लुटारू त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले होते त्यांनीही त्याची तशीच निंदा केली. मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. आणि सुमारे नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एली, एली, लमा सबख्थनी,” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”