नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्याविरुद्ध जमवली.
त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी झगा घातला;
काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेत दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून, ‘हे यहूद्यांच्या राजा, नमस्कार!’ असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली.
ते त्याच्यावर थुंकले व तोच वेत घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले.
मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता घेऊन गेले.
ते बाहेर जात असता शिमोन नावाचा कोणीएक कुरेनेकर मनुष्य त्यांना आढळला; त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरता वेठीस धरले.
मग गुलगुथा नावाची जागा, म्हणजे कवटीची जागा, येथे येऊन पोचल्यावर
त्यांनी त्याला ‘पित्तमिश्रित द्राक्षारस पिण्यास दिला,’ परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना.
त्याला वधस्तंभावर खिळल्यावर ‘त्यांनी चिठ्ठ्या टाकून’ त्याची ‘वस्त्रे वाटून घेतली;’ [जे संदेष्ट्याने सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले; ते असे की, ‘त्यांनी माझी वस्त्रे वाटून घेतली व माझ्या वस्त्रावर चिठ्ठ्या टाकल्या’].
नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करत राहिले.
त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लावला; तो असा : “हा यहूद्यांचा राजा येशू आहे.”
त्या वेळी त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक त्याच्या उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले.
आणि जवळून जाणारेयेणारे ‘डोकी डोलवत’ त्याची अशी निंदा करत होते की,
“अरे, मंदिर मोडून तीन दिवसांत बांधणार्या, तू देवाचा पुत्र असलास तर स्वतःचा बचाव कर आणि वधस्तंभावरून खाली उतर.”
तसेच मुख्य याजकही, शास्त्री व वडील ह्यांच्याबरोबरीने थट्टा करत म्हणाले,
“त्याने दुसर्यांना वाचवले; त्याला स्वतःला वाचवता येत नाही; तो इस्राएलाचा राजा आहे; त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू.
‘तो देवावर भरवसा ठेवतो; तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला’ आता ‘सोडवावे’; कारण मी देवाचा पुत्र आहे, असे तो म्हणत असे.”
जे लुटारू त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले होते त्यांनीही त्याची तशीच निंदा केली.
मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला.
आणि सुमारे नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एली, एली, लमा सबख्थनी,” म्हणजे “माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?”
तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, “तो एलीयाला हाक मारतो.”
मग त्यांच्यातून एकाने लगेचच धावत जाऊन स्पंज घेतला आणि तो ‘आंबेने’ भरून बोरूच्या टोकावर ठेवून त्याला ‘चोखण्यास दिला.’
इतर म्हणाले, “असू दे, एलीया त्याचा बचाव करायला येतो की काय हे आपण पाहू.”
मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला.
तेव्हा पाहा, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला, भूमी कापली, खडक फुटले;
थडगी उघडली, आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली;
आणि ते त्यांच्या पुनरुत्थानानंतर, थडग्यांतून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले.
शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे, हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून, अत्यंत भयभीत झाले व “खरोखर हा देवाचा पुत्र होता,” असे म्हणाले.
तेथे पुष्कळ स्त्रिया दुरून हे पाहत होत्या; त्या येशूची सेवा करीत गालीलाहून त्याच्यामागे आल्या होत्या.
त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, याकोब व योसे ह्यांची आई मरीया, व जब्दीच्या मुलांची आई ह्या होत्या.