YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 27:1-31

मत्तय 27:1-31 MARVBSI

प्रातःकाळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांनी येशूला जिवे मारण्यासाठी त्याच्याविरुद्ध मसलत केली; आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन सुभेदार पिलात ह्याच्या स्वाधीन केले. तेव्हा तो शिक्षापात्र ठरवण्यात आला असे पाहून, त्याला धरून देणारा यहूदा पस्तावला, आणि ते तीस रुपये मुख्य याजक व वडील ह्यांच्याकडे परत आणून म्हणाला, “मी निर्दोष जिवाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहून घे.” मग त्याने ते रुपये मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला. मुख्य याजकांनी ते रुपये गोळा करून म्हटले, “हे दानकोशात टाकणे सशास्त्र नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे.” मग त्यांनी आपसांत विचार करून त्या रुपयांचे, उपर्‍यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. ह्यामुळे त्या शेताला ‘रक्ताचे शेत’ असे आजपर्यंत म्हणतात. तेव्हा जे वचन यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण झाले; ते असे की, “‘आणि ज्याचे मोल इस्राएलाच्या वंशजांपैकी काहींनी ठरवले, त्याचे मोल, म्हणजे ते तीस रुपये, त्यांनी घेतले आणि परमेश्वराने’ मला ‘आज्ञा केल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी दिले.”’ मग येशूला सुभेदाराच्या पुढे उभे केले असता सुभेदाराने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने त्याला म्हटले, “आपण म्हणता तसेच.” मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा पिलात त्याला म्हणाला, “हे तुझ्याविरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देतात, हे तुला ऐकू येत नाही काय?” परंतु त्याने एकाही आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही; ह्याचे सुभेदाराला फार आश्‍चर्य वाटले. त्या सणात लोक सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची सुभेदाराची रीत होती. आणि त्या वेळेस तेथे बरब्बा नावाचा एक कुप्रसिद्ध बंदिवान होता. म्हणून ते जमल्यावर पिलाताने त्यांना म्हटले, “मी तुमच्याकरता कोणाला सोडून द्यावे म्हणून तुमची इच्छा आहे? बरब्बाला किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूला?” कारण त्यांनी येशूला हेव्याने धरून दिले हे त्याला ठाऊक होते. तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला की, “त्या नीतिमान मनुष्याच्या बाबीत आपण पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या.” इकडे मुख्य याजक व वडील ह्यांनी बरब्बाला मागून घ्यावे व येशूचा नाश करावा, म्हणून लोकसमुदायाचे मन वळवले. सुभेदाराने त्यांना विचारले, “तुमच्याकरता ह्या दोघांतून कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे?” ते म्हणाले, “बरब्बाला.” पिलाताने त्यांना म्हटले, “तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.” तो म्हणाला, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे?” तेव्हा ते फारच आरडाओरड करत म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.” ह्यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुऊन म्हटले, “मी ह्या [नीतिमान] मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पाहा.” सर्व लोकांनी उत्तर दिले की, “त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर असो.” तेव्हा त्याने त्यांच्याकरता बरब्बाला सोडले, व येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले. नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्याविरुद्ध जमवली. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी झगा घातला; काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेत दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून, ‘हे यहूद्यांच्या राजा, नमस्कार!’ असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. ते त्याच्यावर थुंकले व तोच वेत घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला वधस्तंभावर खिळण्याकरता घेऊन गेले.