YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 26:47-75

मत्तय 26:47-75 MARVBSI

तो बोलत आहे इतक्यात, पाहा, बारा जणांतील एक जो यहूदा तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांच्याकडून तलवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता. त्याला धरून देणार्‍याने त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा.” मग त्याने लगेचच येशूजवळ येऊन, “गुरूजी, सलाम,” असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. येशूने त्याला म्हटले, “गड्या, ज्यासाठी आलास ते कर.” तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली. मग पाहा, येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने हात लांब करून आपली तलवार उपसली व प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्व जण तलवारीने नाश पावतील. तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावेत?” त्याच वेळेस येशू लोकसमुदायांना म्हणाला, “एखाद्या लुटारूला धरावे तसे मला धरण्यास तुम्ही तलवारी व सोटे घेऊन बाहेर आला आहात काय? मी दररोज मंदिरात बसून शिक्षण देत असे तेव्हा तुम्ही मला धरले नाही. पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावेत म्हणून हे सर्व झाले आहे.” तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. मग येशूला अटक करणार्‍यांनी त्याला प्रमुख याजक कयफा ह्याच्याकडे शास्त्री व वडील जमले होते तेथे नेले. पण पेत्र प्रमुख याजकाच्या वाड्यापर्यंत दुरून त्याच्या मागेमागे चालत गेला व आत जाऊन, शेवट काय होतो हे पाहण्यास कामदारांमध्ये बसला. मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा हे येशूला जिवे मारण्याच्या हेतूने त्याच्याविरुद्ध खोटा पुरावा शोधत होते; आणि बरेच खोटे साक्षीदार आले असताही तो त्यांना मिळाला नाही. तरी शेवटी दोघे [खोटे साक्षी] येऊन म्हणाले की, “‘देवाचे मंदिर मोडण्यास व तीन दिवसांत ते बांधण्यास मी समर्थ आहे’ असे ह्याने म्हटले.” तेव्हा प्रमुख याजक उठून त्याला म्हणाला, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय? हे तुझ्याविरुद्ध साक्ष देतात हे काय?” तथापि येशू उगाच राहिला. ह्यावरून प्रमुख याजकाने त्याला म्हटले, “मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हांला सांग.”’ येशू त्याला म्हणाला, “होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हांला सांगतो, ह्यापुढे तुम्ही ‘मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले’ व ‘आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल.”’ तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, “ह्याने दुर्भाषण केले आहे; आम्हांला साक्षीदारांची आणखी काय गरज? पाहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे. तुम्हांला काय वाटते?” त्यांनी उत्तर दिले की, “हा मरणदंडास पात्र आहे.” तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्‍क्या मारल्या आणि कोणी त्याला चपराका मारून म्हटले, “अरे ख्रिस्ता, आम्हांला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले?” इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता; तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, “तूही गालीलकर येशूबरोबर होतास.” तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही.” मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथील लोकांना म्हटले, “हा नासोरी येशूबरोबर होता.” पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, “खरोखर, तूही त्यांच्यातला आहेस, कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे दिसून येते.” तेव्हा तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा “कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील” असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.