YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 26:1-56

मत्तय 26:1-56 MARVBSI

मग असे झाले की, येशूने सर्व बोलणे समाप्त केल्यावर आपल्या शिष्यांना म्हटले, “तुम्हांला ठाऊक आहे की, दोन दिवसांनी वल्हांडण सण आहे, आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळण्याकरता धरून दिला जाईल.” तेव्हा कयफा नावाच्या प्रमुख याजकाच्या वाड्यात मुख्य याजक [व शास्त्री] आणि लोकांचा वडीलवर्ग जमला; आणि येशूला कपटाने धरून जिवे मारावे अशी त्यांनी मसलत केली. परंतु ते म्हणाले, “लोकांमध्ये गडबड होऊ नये म्हणून हे सणात नको.” तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी असता, कोणीएक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली. हे पाहून शिष्य रागावून म्हणाले, “हा नाश कशाला? हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबांना देता आले असते.” येशूने हे जाणून त्यांना म्हटले, “ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे. कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही. हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले हे माझ्या उत्तरकार्यासाठी केले. मी तुम्हांला खचीत सांगतो, सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवतील तेथे तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील.” तेव्हा यहूदा इस्कर्योत नावाच्या बारा जणांतील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, “मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल?” ‘त्यांनी’ त्याला ‘तीस रुपये तोलून दिले.’ तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “आपणाकरता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?” त्याने म्हटले, “नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की, ‘गुरूजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो.”’ मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली. संध्याकाळ झाल्यावर तो बारा शिष्यांसह भोजनास बसला; आणि ते भोजन करत असताना त्याने म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्यातला एक जण मला धरून देईल.” तेव्हा ते फार खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागला, “प्रभूजी, मी तर नाही ना?” त्याने उत्तर दिले, “ज्याने माझ्याबरोबर ताटात हात घातला तोच मला धरून देईल. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा; परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो, त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार! तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते.” तेव्हा त्याला धरून देणारा यहूदा ह्याने विचारले, “गुरूजी, मी तर नाही ना?” तो त्याला म्हणाला, “होय, तू म्हटले तसेच.” मग ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, “घ्या, खा, हे माझे शरीर आहे.” आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यांना दिला व म्हटले, “तुम्ही सर्व ह्यातून प्या. हे माझे [नव्या] ‘कराराचे रक्त’ आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. मी तुम्हांला सांगतो की, मी आपल्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षारस पिईपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाही.” नंतर गीत गाऊन ते जैतुनांच्या डोंगरावर निघून गेले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व ह्याच रात्री माझ्याविषयी अडखळाल; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल.’ परंतु मी उठवला गेल्यानंतर तुमच्याआधी गालीलात जाईन.” पेत्राने त्याला उत्तर दिले, “आपणाविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही.” येशूने त्याला म्हटले, “मी तुला खचीत सांगतो, ह्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.” पेत्र त्याला म्हणाला, “आपणाबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणाला नाकारणार नाही.” सर्व शिष्यांनीही तसेच म्हटले. नंतर येशू शिष्यांबरोबर गेथशेमाने नावाच्या ठिकाणी आला आणि त्यांना म्हणाला, “मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांना बरोबर घेतले आणि तो खिन्न व अति कष्टी होऊ लागला. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “‘माझा जीव’ मरणप्राय, ‘अति खिन्न झाला आहे,’ तुम्ही येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.” मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली : “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो; तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, “हे काय, तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा; आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे.” आणखी त्याने दुसर्‍यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, “हे माझ्या बापा, हा प्याला मी प्यायल्याशिवाय टळून जात नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहेत असे पाहिले; कारण त्यांचे डोळे जड झाले होते. नंतर त्यांना सोडून त्याने पुन्हा जाऊन तिसर्‍यांदा पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली. आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यांना म्हणाला, “आता झोप व विसावा घ्या, पाहा, घटका जवळ आली आहे, आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ; पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.” तो बोलत आहे इतक्यात, पाहा, बारा जणांतील एक जो यहूदा तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांच्याकडून तलवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता. त्याला धरून देणार्‍याने त्यांना अशी खूण सांगून ठेवली होती की, “मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे, त्याला धरा.” मग त्याने लगेचच येशूजवळ येऊन, “गुरूजी, सलाम,” असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. येशूने त्याला म्हटले, “गड्या, ज्यासाठी आलास ते कर.” तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली. मग पाहा, येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने हात लांब करून आपली तलवार उपसली व प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्व जण तलवारीने नाश पावतील. तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावेत?” त्याच वेळेस येशू लोकसमुदायांना म्हणाला, “एखाद्या लुटारूला धरावे तसे मला धरण्यास तुम्ही तलवारी व सोटे घेऊन बाहेर आला आहात काय? मी दररोज मंदिरात बसून शिक्षण देत असे तेव्हा तुम्ही मला धरले नाही. पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावेत म्हणून हे सर्व झाले आहे.” तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.