YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 26:1-19

मत्तय 26:1-19 MARVBSI

मग असे झाले की, येशूने सर्व बोलणे समाप्त केल्यावर आपल्या शिष्यांना म्हटले, “तुम्हांला ठाऊक आहे की, दोन दिवसांनी वल्हांडण सण आहे, आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळण्याकरता धरून दिला जाईल.” तेव्हा कयफा नावाच्या प्रमुख याजकाच्या वाड्यात मुख्य याजक [व शास्त्री] आणि लोकांचा वडीलवर्ग जमला; आणि येशूला कपटाने धरून जिवे मारावे अशी त्यांनी मसलत केली. परंतु ते म्हणाले, “लोकांमध्ये गडबड होऊ नये म्हणून हे सणात नको.” तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी असता, कोणीएक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली. हे पाहून शिष्य रागावून म्हणाले, “हा नाश कशाला? हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबांना देता आले असते.” येशूने हे जाणून त्यांना म्हटले, “ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे. कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही. हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले हे माझ्या उत्तरकार्यासाठी केले. मी तुम्हांला खचीत सांगतो, सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवतील तेथे तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील.” तेव्हा यहूदा इस्कर्योत नावाच्या बारा जणांतील एकाने मुख्य याजकाकडे जाऊन म्हटले, “मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल?” ‘त्यांनी’ त्याला ‘तीस रुपये तोलून दिले.’ तेव्हापासून तो त्याला धरून देण्याची संधी पाहू लागला. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “आपणाकरता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे?” त्याने म्हटले, “नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की, ‘गुरूजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो.”’ मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली.