कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणार्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, त्याप्रमाणे हे आहे.
एकाला त्याने पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या-त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले; आणि तो परदेशी गेला.
ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेचच जाऊन त्यांवर व्यापार केला व आणखी पाच हजार मिळवले.
तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्यानेही आणखी दोन हजार मिळवले.
परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात आपल्या धन्याचा पैका लपवून ठेवला.
मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला.
तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, ‘महाराज, आपण मला पाच हजार रुपये सोपवून दिले होते; पाहा, त्यांवर मी आणखी पाच हजार रुपये मिळवले आहेत.’
त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’
मग ज्याला दोन हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, ‘महाराज, आपण मला दोन हजार रुपये सोपवून दिले होते; पाहा, त्यांवर मी आणखी दोन हजार रुपये मिळवले आहेत.’
त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’
नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, ‘महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहात; जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता;
म्हणून मी भ्यालो व तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते; पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत.’
तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, ‘अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो व पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय?
तर माझे पैसे सावकारांकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते.
तर ते हजार रुपये त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या.
कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल; आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल;
आणि ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका; तेथे रडणे व दात खाणे चालेल.’
जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने ‘सर्व पवित्र देवदूतांसह येईल,’ तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल.
त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील; आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील,
आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरडांना डावीकडे ठेवील.
तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, ‘अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या;
कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले,
उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात.’
त्या वेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, ‘प्रभूजी, आम्ही तुम्हांला केव्हा भुकेले पाहून खायला दिले? केव्हा तान्हेले पाहून प्यायला दिले?
तुम्हांला परके पाहून केव्हा घरात घेतले? उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले?
आणि तुम्हांला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो?’
तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे.’
मग डावीकडच्यांनाही तो म्हणेल, ‘अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.
कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले नाही,
परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही; उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाहीत.’
त्या वेळेस हेही त्याला उत्तर देतील, ‘प्रभूजी, आम्ही केव्हा तुम्हांला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही?’
तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्या अर्थी ते मला केले नाही.’
‘ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील.”’