YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 24:36-51

मत्तय 24:36-51 MARVBSI

त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांना नाही, पुत्रालाही नाही. नोहाच्या दिवसांत होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत ‘नोहा तारवात गेला’ त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहवून नेईपर्यंत त्यांना समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. त्या वेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी एक घेतला जाईल व एक ठेवला जाईल. जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल व एक ठेवली जाईल. म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हांला ठाऊक नाही. आणखी हे समजा की, कोणत्या प्रहरी चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता, आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. ज्या विश्वासू व बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवाराला यथाकाळी खाण्यास देण्यासाठी त्यांच्यावर नेमले आहे असा दास कोण? धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. मी तुम्हांला खचीत सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. परंतु ‘माझा धनी येण्यास विलंब लागेल’ असे जर एखादा दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल, आणि आपल्या सोबतीच्या दासांना मारू लागेल व झिंगलेल्यांबरोबर खाईलपिईल, तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी व त्याला माहीत नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन त्याला छाटून टाकील व ढोंग्यांना देण्याचा वाटा त्याच्या पदरी बांधील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.