YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 24:1-22

मत्तय 24:1-22 MARVBSI

मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवण्यास जवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “हे सर्व तुम्हांला दिसते ना? मी तुम्हांला खचीत सांगतो, येथे चिर्‍यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही.” तो जैतुनांच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकान्ती येऊन म्हणाले, “ह्या गोष्टी केव्हा होतील, आणि आपल्या येण्याचे व ह्या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हांला सांगा.” येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्हांला कोणी फसवू नये, म्हणून सावध असा. कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन ‘मी ख्रिस्त आहे’ असे म्हणतील व अनेकांना फसवतील. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल; घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा; कारण ‘असे होणे अवश्य आहे;’ परंतु तेवढ्यात शेवट होत नाही. कारण ‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल’ आणि जागोजागी दुष्काळ, मर्‍या व भूमिकंप होतील; पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहेत. तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हांला धरून देतील व तुम्हांला जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्या वेळी ‘पुष्कळ जण अडखळतील’, एकमेकांना धरून देतील, व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांना फसवतील. आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. दानिएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात’ उभा असलेला तुम्ही पाहाल, (वाचकाने हे ध्यानात आणावे), तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे; जो धाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर काढण्याकरता खाली उतरू नये; आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता माघारी येऊ नये. त्या दिवसांत ज्या गरोदर व ज्या अंगावर पाजणार्‍या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! तुमचे पलायन हिवाळ्यात किंवा शब्बाथ दिवशी होऊ नये म्हणून प्रार्थना करा. कारण ‘जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट’ त्या काळी येईल. आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील.