अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण पुदिना, बडीशेप व जिरे ह्यांचा दशांश तुम्ही देता, आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत; ह्या करायच्या होत्या, तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही.
अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकूट गाळून काढता व उंट गिळून टाकता!
अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम व असंयम ह्यांनी भरलेली आहेत.
अरे आंधळ्या परूशा, आधी वाटी आतून साफ कर म्हणजे ती बाहेरूनही साफ होईल.
अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात; त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत.
तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहात.
अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजवता;
आणि म्हणता, ‘आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो.’
ह्यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणार्यांचे पुत्र आहात, अशी तुम्ही स्वतःविरुद्ध साक्ष देता.
तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा.
अहो सापांनो, सापांच्या पिलांनो, तुम्ही नरकदंड कसा चुकवाल?
म्हणून पाहा, मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी व शास्त्री ह्यांना पाठवतो; तुम्ही त्यांच्यातील कित्येकांना जिवे माराल व वधस्तंभावर खिळाल आणि कित्येकांना तुम्ही आपल्या सभास्थानांमध्ये फटके माराल व नगरोनगरी त्यांचा पाठलाग कराल;
ह्यासाठी की, नीतिमान हाबेल ह्याच्या रक्तापासून वेदी व पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जिवे मारले तो बरख्याचा पुत्र जखर्या ह्याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे जे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्याचा दोष तुमच्यावर यावा.
मी तुम्हांला खचीत सांगतो, ह्या सर्व गोष्टी ह्या पिढीवर येतील.
यरुशलेमे, यरुशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यांना धोंडमार करणारे! जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते, तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती!
पाहा, ‘तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे.’
मी तुम्हांला सांगतो, आतापासून ‘प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित,’ असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणारच नाही.”