YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 23:1-22

मत्तय 23:1-22 MARVBSI

तेव्हा येशू लोकसमुदायांना व आपल्या शिष्यांना म्हणाला, “शास्त्री व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत; म्हणून ते जे काही तुम्हांला सांगतील ते सर्व आचरत व पाळत जा; परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे आचरण करू नका; कारण ते सांगतात पण तसे आचरण करत नाहीत. जड व वाहण्यास अवघड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यांवर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वत: बोटही लावायचे नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात; ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात; जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानातील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरूजी म्हणवून घेणे त्यांना आवडते. तुम्ही तर आपणांस गुरूजी म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा एकच गुरू [ख्रिस्त] आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहात. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे. तसेच आपणांस स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे, तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वत:ला उंच करील तो नमवला जाईल आणि जो कोणी स्वत:ला नमवील तो उंच केला जाईल. अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्‍यांनाही आत जाऊ देत नाही. [अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, ढोंग्यानो! तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांबलांब प्रार्थना करता; ह्यामुळे तुम्हांला अधिक शिक्षा होईल.] अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही एक मतानुयायी मिळवण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणांहून दुप्पट असा नरकपुत्र करता. अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! तुम्ही म्हणता, ‘कोणी मंदिराची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली तर मात्र तो बांधला जातो.’ अहो मूर्खांनो आणि आंधळ्यांनो, ह्यांतून मोठे कोणते? ते सोने किंवा ज्याच्या योगाने ते सोने पवित्र झाले ते मंदिर? तुम्ही म्हणता, ‘कोणी वेदीची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी तिच्यावरील अर्पणाची शपथ घेतली तर तो बांधला जातो.’ अहो मूर्खांनो व आंधळ्यांनो, ह्यांतून मोठे कोणते? अर्पण किंवा अर्पण पवित्र करणारी ती वेदी? म्हणून जो कोणी वेदीची शपथ घेतो तो तिची व तिच्यावर जे काही आहे त्याची शपथ घेतो; आणि जो मंदिराची शपथ घेतो, तो त्याची व त्यात राहणार्‍याची शपथ घेतो; आणि जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या राजासनाची व त्याच्यावर बसणार्‍याची शपथ घेतो.