YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 22:34-46

मत्तय 22:34-46 MARVBSI

त्याने सदूक्यांना निरुत्तर केले हे ऐकून परूशी एकत्र जमले. आणि त्यांच्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले, “गुरूजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे?” येशू त्याला म्हणाला, “‘तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर.’ हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजार्‍यावर स्वतःसारखी प्रीती कर.’ ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.” परूशी एकत्र जमले असता येशूने त्यांना विचारले, “ख्रिस्ताविषयी तुम्हांला काय वाटते? तो कोणाचा पुत्र आहे?” ते त्याला म्हणाले, “दाविदाचा.” त्याने त्यांना म्हटले, “तर मग दावीद आत्म्याच्या प्रेरणेने त्याला प्रभू असे कसे म्हणतो? ‘परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायांखाली घालीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.’ दावीद जर त्याला प्रभू म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असणार?” तेव्हा कोणाला एका शब्दानेही त्याला उत्तर देता येईना आणि त्या दिवसापासून त्याला आणखी काही विचारण्यास कोणीही धजला नाही.