ते यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेथफगे येथवर पोहचले तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की, “तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे लगेच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हांला आढळतील; ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हांला काही म्हटले, तर ‘प्रभूला ह्यांची गरज आहे,’ असे सांगा म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील.” संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले; ते असे की, “सीयोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर, म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे.” तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले; गाढवी व शिंगरू आणून त्यांनी त्यांच्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; काही झाडांच्या डाहळ्या तोडत होते व त्या वाटेवर पसरत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले की, ‘दाविदाच्या पुत्राला होसान्ना!’ ‘परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित!’ ‘ऊर्ध्वलोकी होसान्ना!’ तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, “हा कोण?” लोकसमुदाय म्हणाले, “गालीलातील नासरेथाहून आलेला हा येशू संदेष्टा आहे.” नंतर येशू देवाच्या मंदिरात गेला आणि मंदिरात जे क्रयविक्रय करत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालवून दिले, सराफांचे चौरंग व कबुतरे विकणार्यांच्या बैठका पालथ्या केल्या. तो त्यांना म्हणाला, “‘माझ्या घरास प्रार्थनामंदिर म्हणतील’ असे लिहिले आहे; परंतु तुम्ही ते ‘लुटारूंची गुहा’ करत आहात.” मग आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले. तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला ‘होसान्ना’ असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले; व त्याला म्हणाले, “ही काय म्हणतात हे तू ऐकतोस काय?” येशूने त्यांना म्हटले, “होय; ‘बालके व तान्ही मुले ह्यांच्या मुखांतून तू स्तुती पूर्ण करवली आहे’, हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?” नंतर तो त्यांना सोडून नगराबाहेर बेथानीस गेला व तेथे वस्तीस राहिला. मग सकाळी तो परत नगरास येत असता त्याला भूक लागली. आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते ते पाहून तो त्याच्याजवळ गेला; पण पानांशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, “ह्यापुढे तुला कधीही फळ न येवो.” आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले, “अंजिराचे झाड लगेच कसे वाळून गेले?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, तुमच्या ठायी विश्वास असला व तुम्ही संशय धरला नाही, तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल, इतकेच नाही, तर ह्या डोंगरालाही ‘तू उपटून समुद्रात टाकला जा’ असे म्हणाल तर तसे होईल. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हांला मिळेल.”
मत्तय 21 वाचा
ऐका मत्तय 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 21:1-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ