YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 21:1-11

मत्तय 21:1-11 MARVBSI

ते यरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेथफगे येथवर पोहचले तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगून पाठवले की, “तुम्ही समोरच्या गावात जा म्हणजे लगेच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हांला आढळतील; ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हांला काही म्हटले, तर ‘प्रभूला ह्यांची गरज आहे,’ असे सांगा म्हणजे तो ती ताबडतोब पाठवील.” संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले; ते असे की, “सीयोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर, म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे.” तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले; गाढवी व शिंगरू आणून त्यांनी त्यांच्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; काही झाडांच्या डाहळ्या तोडत होते व त्या वाटेवर पसरत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले की, ‘दाविदाच्या पुत्राला होसान्ना!’ ‘परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित!’ ‘ऊर्ध्वलोकी होसान्ना!’ तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, “हा कोण?” लोकसमुदाय म्हणाले, “गालीलातील नासरेथाहून आलेला हा येशू संदेष्टा आहे.”