YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 13:33-58

मत्तय 13:33-58 MARVBSI

त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.” ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही; ह्यासाठी की, संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, “मी आपले तोंड उघडून दाखले देईन; जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन.” नंतर तो लोकसमुदायांना निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हांला फोड करून सांगा.” त्याने उत्तर दिले की, “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे; शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत; ते पेरणारा वैरी हा सैतान आहे; कापणी ही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील, आणि ते सर्व ‘अडखळवणार्‍यांना व अनाचार करणार्‍यांना’ त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा ‘नीतिमान’ आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे ‘प्रकाशतील.’ ज्याला कान आहेत तो ऐको. स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे; ती कोणाएका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात तो जातो, आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो. आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांचा शोध करणार्‍या कोणाएका व्यापार्‍यासारखे आहे; त्याला एक अति मोलवान मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे; ते भरल्यावर माणसांनी ते किनार्‍याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यांत जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्हांला ह्या सर्व गोष्टी समजल्या काय?” ते त्याला म्हणाले, “होय प्रभूजी.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “प्रत्येक शास्त्री जो स्वर्गाच्या राज्याचा शिष्य झाला आहे तो आपल्या भांडारातून नव्याजुन्या गोष्टी काढणार्‍या गृहस्थासारखा आहे.” नंतर असे झाले की, हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तेथून निघाला. आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्‍चर्यचकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान व अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून? हा सुताराचा पुत्र ना? ह्याच्या आईला मरीया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन व यहूदा, हे ह्याचे भाऊ ना? ह्याच्या बहिणी, त्या सर्व आपल्याबरोबर नाहीत काय? मग हे सर्व ह्याला कोठून?” असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यांना म्हटले, “संदेष्ट्याला आपला देश व आपले घर ह्यांत मात्र सन्मान मिळत नाही.” तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत.