मग त्याने त्यांना दाखल्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, “पाहा, पेरणारा पेरणी करण्यास निघाला.
आणि तो पेरत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले.
काही खडकाळीवर पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती, आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले;
आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले.
काही काटेरी झाडांमध्ये पडले; मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली.
काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले.
ज्याला कान आहेत तो ऐको.”
मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, “आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता?”
त्याने त्यांना उत्तर दिले, “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हांला दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.
कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल; परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.
ह्यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत, आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही.
यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की,
‘तुम्ही ऐकाल तर खरे,
परंतु तुम्हांला समजणारच नाही,
व पाहाल तर खरे,
परंतु तुम्हांला दिसणारच नाही;
कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे,
ते कानांनी मंद ऐकतात,
आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत;
ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये,
कानांनी ऐकू नये,
अंतःकरणाने समजू नये व वळू नये,
आणि मी त्यांना बरे करू नये.’
पण धन्य तुमचे डोळे, कारण ते पाहत आहेत; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत.
मी तुम्हांला खचीत सांगतो की, तुम्ही जे पाहत आहात ते पाहण्यास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही; आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकण्यास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही.
आता तुम्ही पेरणार्याचा दाखला ऐकून घ्या.
कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो; वाटेवर पेरलेला तो हा आहे.
खडकाळीवर पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते तत्काळ आनंदाने ग्रहण करतो;
परंतु त्याला मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो, आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लगेच अडखळतो.
काटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो.
चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.”