मग आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणले; आणि त्याने त्याला बरे केले, तेव्हा तो मुका बोलू व पाहू लागला.
तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?”
परंतु परूशी हे ऐकून म्हणाले, “भुतांचा अधिपती जो बाल्जबूल त्याच्या साहाय्याशिवाय हा भुते काढत नाही.”
येशूने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, “आपसांत फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसांत फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही.
सैतान जर सैतानाला काढत असेल तर त्याच्यात फूट पडली आहे; मग त्याचे राज्य कसे टिकणार?
आणि मी जर बाल्जबूलच्या साहाय्याने भुते काढत असेन तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील.
परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भुते काढत आहे तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे.
अथवा बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची चीजवस्तू कोणाला लुटून नेता येईल काय? त्याला बांधले तरच तो त्याचे घर लुटील.
जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही तो उधळून टाकतो.
ह्यास्तव मी तुम्हांला सांगतो की, प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्यांची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही.
मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही; ह्या युगात नाही व येणार्या युगातही नाही.
‘झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले’ असे म्हणा; अथवा ‘झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट’ असे म्हणा; कारण फळावरून झाड कळते.
अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.
चांगला माणूस आपल्या अंतःकरणाच्या चांगल्या भांडारातून चांगल्या गोष्टी काढतो आणि वाईट माणूस आपल्या वाईट भांडारातून वाईट गोष्टी काढतो.
मी तुम्हांला सांगतो की, माणसे जो जो व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल.
कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोषी ठरशील आणि आपल्या बोलण्यावरून दोषी ठरशील.”
तेव्हा शास्त्री व परूशी ह्यांच्यापैकी काही जण त्याला म्हणाले, “गुरूजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे.”
त्याने त्यांना उत्तर दिले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्याच्या चिन्हावाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही.
कारण जसा ‘योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता’ तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.
निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला; आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे.
दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवील; कारण ती शलमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या सीमेपासून आली; आणि पाहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे.
अशुद्ध आत्मा माणसातून निघाला म्हणजे तो विसावा शोधत निर्जल स्थळी फिरत राहतो, परंतु तो त्याला मिळत नाही.
मग तो म्हणतो, ‘ज्या माझ्या घरातून मी निघालो त्यात परत जाईन;’ आणि तेथे गेल्यावर ते त्याला रिकामे असलेले, झाडलेले व सुशोभित केलेले असे आढळते.
नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आत्मे आपणाबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे राहतात; मग त्या माणसाची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते; तसेच ह्या दुष्ट पिढीचेही होईल.
मग तो लोकसमुदायांबरोबर बोलत असता पाहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते.
तेव्हा कोणीएकाने त्याला सांगितले, “पाहा, आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत.”
तेव्हा त्याने सांगणार्याला उत्तर दिले, “कोण माझी आई व कोण माझे भाऊ?”
आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ!
कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई.”