YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 10:5-14

मत्तय 10:5-14 MARVBSI

ह्या बारा जणांना येशूने अशी आज्ञा करून पाठवले की, “परराष्ट्रीयांकडे जाणार्‍या वाटेने जाऊ नका व शोमरोन्यांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका; तर इस्राएलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकडे जा. जात असताना अशी घोषणा करत जा की, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.’ रोग्यांना बरे करा, मेलेल्यांना उठवा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भुते काढा. तुम्हांला फुकट मिळाले, फुकट द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका, वाटेसाठी झोळणा, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका, कारण कामकर्‍यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. आणि घरात जाताना, ‘तुम्हांला शांती असो,’ असे म्हणा. ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो; ते योग्य नसले तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही व तुमची वचने ऐकणार नाही, त्याच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका.