नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना, एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभांवर खिळले. तेव्हा येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” नंतर त्याची ‘वस्त्रे आपसांत वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.’ लोक ‘पाहत’ उभे होते; अधिकारीही ‘नाक मुरडत म्हणाले,’ “त्याने दुसर्यांना वाचवले, जर तो देवाचा ख्रिस्त, त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःस वाचवावे.” शिपायांनीही जवळ येऊन ‘आंब’ त्याच्यापुढे धरून, त्याची अशी थट्टा केली की, “तू यहूद्यांचा राजा असलास तर स्वतःला वाचव.” हा यहूद्यांचा राजा आहे, असा [हेल्लेणी, रोमी, व इब्री अक्षरांत लिहिलेला] एक लेखही त्याच्या वरती होता. वधस्तंभांवर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हांलाही वाचव.” परंतु दुसर्याने त्याचा निषेध करून म्हटले, “तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवालासुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे; कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत; परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही.” मग तो म्हणाला, “अहो येशू,1 आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” येशू त्याला म्हणाला, “मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.” आता सुमारे दोन प्रहर झाले, आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन तिसर्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला; आणि पवित्रस्थानातील पडदा मधोमध फाटला. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, “हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो!” असे बोलून त्याने प्राण सोडला. तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.” हे दृश्य पाहण्याकरता जमलेले सर्व लोकसमुदाय झालेल्या घटना पाहून ऊर बडवीत परत गेले. तेव्हा त्याच्या ‘ओळखीचे’ सर्व जण व ज्या स्त्रिया त्याच्यामागे गालीलाहून आल्या होत्या त्या हे पाहत ‘दूर उभ्या राहिल्या होत्या.’ यहूद्यांच्या अरिमथाई नगरातला योसेफ नावाचा एक मनुष्य होता, तो न्यायसभेचा सदस्य असून सज्जन व नीतिमान होता. त्याने त्यांच्या विचाराला व कृत्याला संमती दिली नव्हती व तो देवाच्या राज्याची प्रतीक्षा करत होता. त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. ते त्याने खाली काढून तागाच्या वस्त्राने गुंडाळले व खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. ह्या कबरेत अद्याप कोणाला ठेवले नव्हते. तो तयारी करण्याचा दिवस होता; आणि शब्बाथ सुरू होणार होता. गालीलाहून त्याच्याबरोबर आलेल्या स्त्रियांनी त्याच्यामागून येऊन ती कबर पाहिली व त्याचे शरीर कसे ठेवले हेही पाहिले. मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्ये व सुवासिक तेले तयार केली. शब्बाथ दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या.
लूक 23 वाचा
ऐका लूक 23
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 23:33-56
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ