YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 23:1-26

लूक 23:1-26 MARVBSI

नंतर ती सर्व मंडळी उठली व त्यांनी त्याला पिलाताकडे नेले. आणि ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की, “हा आमच्या राष्ट्राला फितवताना, कैसराला कर देण्याची मनाई करताना आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे असे म्हणताना आम्हांला आढळला.” तेव्हा पिलाताने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” त्याने त्याला उत्तर दिले, “आपण म्हणता तसेच.” तेव्हा मुख्य याजकांना व लोकसमुदायांना पिलाताने म्हटले, “मला ह्या मनुष्यात काही दोष आढळत नाही.” तरी ते अधिकच आग्रह धरून म्हणाले, “ह्याने गालीलापासून आरंभ करून येथपर्यंत सार्‍या यहूदीयात शिक्षण देऊन लोकांना चिथवले आहे.” तेव्हा पिलाताने हे ऐकून “हा मनुष्य गालीली आहे काय?” असे विचारले. आणि तो हेरोदाच्या अंमलातला आहे असे समजल्यावर त्याने त्याला हेरोदाकडे पाठवले, कारण तोही त्या दिवसांत यरुशलेमेत होता. येशूला पाहून हेरोदाला फार संतोष झाला; कारण त्याच्याविषयी ऐकले असल्यामुळे त्याला भेटावे अशी बर्‍याच दिवसांपासून त्याची इच्छा होती, आणि त्याच्या हातून घडलेला एखादा चमत्कार पाहायला मिळेल अशी त्याला आशा होती. त्याने त्याला बरेच प्रश्‍न केले; परंतु येशूने काही उत्तर दिले नाही. मुख्य याजक व शास्त्री उभे राहून आवेशाने त्याच्यावर आरोप करत होते. आणि हेरोदाने व त्याच्या शिपायांनी त्याचा धिक्कार व उपहास करून आणि झगझगीत वस्त्रे त्याच्या अंगावर घालून त्याला पिलाताकडे परत पाठवले. त्याच दिवशी पिलात व हेरोद हे एकमेकांचे मित्र झाले; त्यापूर्वी त्यांचे आपसांत वैर होते. मग पिलाताने मुख्य याजक, अधिकारी व लोक ह्यांना एकत्र बोलावून म्हटले, “हा मनुष्य लोकांना फितवणारा म्हणून ह्याला तुम्ही माझ्याकडे आणले; आणि पाहा, ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही ह्याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष ह्याची चौकशी केल्यावर मला ह्या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही; हेरोदालाही सापडला नाही; कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठवले आहे; आणि पाहा, ह्याने मरणदंड भोगण्यासारखे काही केलेले नाही. म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो.” [कारण त्या सणात त्याला त्यांच्याकरता एकाला सोडावे लागत असे.] परंतु सर्वांनी एकच ओरडा करून म्हटले, “ह्याची वाट लावा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.” हा माणूस शहरात झालेला दंगा व खून ह्यांमुळे तुरुंगात टाकलेला होता. येशूला सोडावे ह्या इच्छेने पिलाताने पुन्हा त्यांच्याबरोबर भाषण केले. तरी “ह्याला वधस्तंभावर खिळा,” “वधस्तंभावर खिळा,” असे ते ओरडत राहिले. तो त्यांना तिसर्‍यांदा म्हणाला, “का बरे? त्याने काय वाईट केले आहे? त्याच्याकडे मरणदंड होण्यासारखा काही दोष मला सापडला नाही; म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो.” पण ‘ह्याला वधस्तंभावर खिळाच’ असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालवला; आणि त्यांच्या व मुख्य याजकांच्या ओरडण्याला यश आले. तेव्हा त्यांच्या मागण्याप्रमाणे व्हावे असा पिलाताने निकाल दिला. नंतर दंगा व खून ह्यांमुळे तुरुंगात टाकलेल्या ज्याला त्यांनी मागितले होते त्याला त्याने सोडून दिले आणि येशूला त्यांच्या मर्जीवर सोपवून दिले. पुढे ते त्याला घेऊन जात असता कोणीएक कुरेनेकर शिमोन शेतावरून येत होता. त्याला त्यांनी धरून त्याच्यावर वधस्तंभ लादला आणि त्याला येशूच्या मागे तो वाहण्यास लावले.