YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 22:47-71

लूक 22:47-71 MARVBSI

तो बोलत आहे इतक्यात पाहा, लोकसमुदाय आला, त्यात यहूदा नावाचा बारा जणांतला एक जण त्यांच्यापुढे चालत होता; तो येशूचे चुंबन घेण्यास त्याच्याजवळ आला. येशू त्याला म्हणाला, “यहूदा, चुंबन घेऊन मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय?” त्याच्यासभोवती जे होते ते आता काय होणार हे ओळखून त्याला म्हणाले, “प्रभूजी, आम्ही तलवार चालवावी काय?” त्यांच्यातील एकाने प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा उजवा कान छाटून टाकला. तेव्हा येशूने म्हटले, “एवढे होऊ द्या!” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श करून त्याला बरे केले. जे मुख्य याजक, मंदिराचे सरदार व वडील त्याच्यावर चालून आले होते त्यांना येशू म्हणाला, “जसे लुटारूवर जावे तसे तुम्ही तलवारी व सोटे घेऊन निघालात काय? मी दररोज मंदिरात तुमच्याबरोबर असे तरी तुम्ही माझ्यावर हात टाकला नाही; पण ही तुमची घटका आणि अंधाराची सत्ता आहे.” मग त्यांनी त्याला पकडून चालवले व प्रमुख याजकाच्या घरी नेले; तेव्हा पेत्र दुरून मागे मागे चालू लागला. ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटवून एकत्र बसले होते, त्यांच्यामध्ये पेत्र जाऊन बसला. तेव्हा एका दासीने त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, “हाही त्याच्याबरोबर होता.” पण ते नाकारून तो बोलला, “बाई, मी त्याला ओळखत नाही.” काही वेळाने दुसर्‍या एकाने त्याला पाहून म्हटले, “तूही त्यांच्यातला आहेस.” पेत्र म्हणाला, “गृहस्था, मी नाही.” सुमारे एक तास झाल्यावर आणखी एक जण खातरीपूर्वक म्हणू लागला, “खरोखर हाही त्याच्याबरोबर होता; हा गालीलीच आहे.” पेत्र म्हणाला, “गृहस्था, तू काय बोलतोस ते मला समजत नाही.” असे तो बोलत आहे इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली; आणि ‘आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,’ असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले. मग तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. ज्या लोकांनी येशूला धरले होते ते त्याची कुचेष्टा करत त्याला मारत होते. त्यांनी त्याचे डोळे बांधून व त्याच्या थोबाडीत मारून त्याला विचारले, “अंतर्ज्ञानाने बोल, तुला कोणी मारले?” आणि नाना प्रकारचे अपशब्द बोलून त्यांनी त्याची निंदा केली. मग उजाडल्यावर लोकांचे वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री एकत्र जमले; आणि ते त्याला आपल्या न्यायसभेत नेऊन म्हणाले, “तू ख्रिस्त असलास तर आम्हांला सांग.” त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला सांगितले तरी तुम्ही मुळीच विश्वास धरणार नाही; आणि मी विचारले तरी तुम्ही मला उत्तर देणार [व सोडणारही]नाही. तथापि ह्यापुढे ‘मनुष्याचा पुत्र’ सर्वसमर्थ ‘देवाच्या उजवीकडे बसेल.”’ तेव्हा ते सर्व म्हणाले, “तर तू देवाचा पुत्र आहेस काय?” तो म्हणाला, “तुम्ही म्हणता की मी आहे.” तेव्हा ते म्हणाले, “आपल्याला साक्षीची आणखी काय गरज? आपण स्वतः ह्याच्या तोंडचे ऐकले आहे.”