YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 22:14-30

लूक 22:14-30 MARVBSI

नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवायला बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती; कारण मी तुम्हांला सांगतो की, देवाच्या राज्यात हे पूर्ण होईपर्यंत मी हे भोजन पुन्हा करणार नाही.” मग प्याला हातात घेऊन व उपकारस्तुती करून तो म्हणाला, “हा घ्या आणि आपणांमध्ये ह्याची वाटणी करा; कारण मी तुम्हांला सांगतो की, देवाचे राज्य येईपर्यंत द्राक्षवेलाचा उपज ह्यापुढे मी पिणार नाही.” मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे; ते तुमच्यासाठी दिले जात आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा.” त्याप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन म्हटले, “हा प्याला माझ्या ‘रक्तात’ नवा ‘करार’ आहे. ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे. पण पाहा, मला धरून देणार्‍याचा हात माझ्याबरोबर मेजावर आहे. मनुष्याचा पुत्र ठरल्याप्रमाणे जातो खरा; परंतु ज्याच्या हातून तो धरून दिला जातो त्या माणसाची केवढी दुर्दशा होणार!” तेव्हा आपल्यापैकी जो असे करणार आहे तो कोण असावा, ह्याचा ते आपसांत विचार करू लागले. आणखी, आपणांमध्ये कोण मोठा मानला जात आहे, ह्याविषयीही त्यांच्यामध्ये वाद झाला. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात; परंतु तुम्ही तसे नसावे; तर तुमच्यामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो पुढारी तो सेवा करणार्‍यासारखा असावा. मोठा कोण? भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनास बसणारा की नाही? मी तर तुमच्यामध्ये सेवा करणार्‍यासारखा आहे. माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहात. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हांला नेमून देतो. ह्यासाठी की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे, आणि राजासनांवर बसून इस्राएलाच्या बारा वंशांचा न्याय करावा.”