YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 20:1-26

लूक 20:1-26 MARVBSI

एके दिवशी तो मंदिरात लोकांना शिक्षण देत व सुवार्ता सांगत असता मुख्य याजक व शास्त्री हे वडीलमंडळासह त्याच्यापुढे येऊन त्याला म्हणाले, “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि तुम्हांला हा अधिकार देणारा कोण हे आम्हांला सांगा.” तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले, “मीही तुम्हांला एक प्रश्‍न विचारतो; त्याचे मला उत्तर द्या. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता किंवा मनुष्यांपासून होता?” तेव्हा ते आपसांत विचार करून म्हणाले, “स्वर्गापासून असे म्हणावे तर हा म्हणेल की, ‘तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ आणि मनुष्यांपासून असे म्हणावे तर सर्व लोक आपल्याला धोंडमार करतील, कारण योहान संदेष्टा होता अशी त्यांची खातरी आहे.” तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “तो कोणापासून होता हे आम्हांला ठाऊक नाही.” येशूने त्यांना म्हटले, “तर कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी मी करतो ते मीही तुम्हांला सांगत नाही.” मग तो लोकांना हा दाखला सांगू लागला, कोणाएका मनुष्याने ‘द्राक्षमळा लावला’ आणि तो मळेकर्‍यांना सोपवून देऊन आपण बरेच दिवस दुसरीकडे जाऊन राहिला. मग मळेकर्‍यांनी आपणाला द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावीत म्हणून त्याने हंगामाच्या वेळी त्यांच्याकडे एका दासाला पाठवले; परंतु मळेकर्‍यांनी त्याला ठोक देऊन रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने दुसर्‍या एका दासाला पाठवले; त्यालाही त्यांनी ठोक देऊन व त्याचा अपमान करून रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने तिसर्‍याला पाठवले; त्यालाही त्यांनी घायाळ करून बाहेर घालवून दिले. तेव्हा द्राक्षमळ्याचा धनी म्हणाला, ‘आता मी काय करू? मी आपल्या प्रिय पुत्राला पाठवतो, कदाचित त्याला पाहून ते त्याचा मान राखतील.’ परंतु मळेकरी त्याला पाहून आपसांत विचार करून म्हणाले, ‘हा तर वारस आहे; ह्याला आपण जिवे मारू म्हणजे वतन आपलेच होईल.’ मग त्यांनी त्याला द्राक्षमळ्याच्या बाहेर काढून जिवे मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी त्यांचे काय करील? तो येऊन त्या मळेकर्‍यांचा नाश करील व द्राक्षमळा दुसर्‍यांना देईल.” हे ऐकून ते म्हणाले, “असे न होवो.” त्याने त्यांच्याकडे रोखून पाहिले व म्हटले, “तर ‘जो दगड बांधणार्‍यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला आहे.’ असा जो शास्त्रलेख आहे त्याचा अर्थ काय? जो कोणी त्या दगडावर पडेल त्याचे तुकडेतुकडे होतील; परंतु ज्या कोणावर तो पडेल त्याचा तो भुगाभुगा करून टाकील.” तेव्हा शास्त्री व मुख्य याजक हे त्याच घटकेस त्याच्यावर हात टाकण्याच्या विचारात होते; पण त्यांना लोकांची भीती वाटली; हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे ते समजले. मग ते त्याच्या पाळतीवर राहिले आणि त्याला बोलण्यात धरून सुभेदाराच्या तावडीत व अधिकारात आणावे म्हणून त्यांनी नीतिमान असल्याची बतावणी केलेले हेर त्याच्याकडे पाठवले. त्यांनी त्याला म्हटले, “गुरूजी, आपण योग्य बोलता व शिक्षण देता, आणि तोंडदेखले बोलत नाही, तर देवाचा मार्ग सत्यास अनुसरून शिकवता हे आम्हांला माहीत आहे. आम्ही कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?” तो त्यांचे कपट ओळखून त्यांना म्हणाला, “[तुम्ही माझी परीक्षा का पाहता?] मला एक नाणे दाखवा. ह्याच्यावरील मुखवटा व लेख कोणाचा आहे?” ते म्हणाले, “कैसराचा.” तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तर कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.” तेव्हा त्यांना लोकांसमक्ष त्याला त्याच्या बोलण्यात धरता येईना, आणि त्याच्या उत्तराचे आश्‍चर्य वाटून ते स्तब्ध राहिले.