YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 2:43-52

लूक 2:43-52 MARVBSI

मग सणाचे दिवस संपल्यावर ते परत जाण्यास निघाले, तेव्हा तो मुलगा येशू यरुशलेमेत मागे राहिला हे त्याच्या आईबापांना कळले नाही. तो वाटेच्या सोबत्यांत असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले; नंतर नातलग व ओळखीचे ह्यांच्यामध्ये त्यांनी त्याचा शोध केला. परंतु तो त्यांना सापडला नाही, म्हणून ते त्याचा शोध करत करत यरुशलेमेस परत गेले. मग असे झाले की, तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात गुरुजनांमध्ये बसून त्यांचे भाषण ऐकताना व त्यांना प्रश्‍न करताना सापडला. त्याचे बोलणे जे ऐकत होते, ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरांवरून थक्क झाले. त्याला तेथे पाहून त्यांना आश्‍चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली, “बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? पाहा, तुझा पिता व मी कष्टी होऊन तुझा शोध करत आलो.” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध करत राहिलात हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” परंतु तो हे जे काही त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर खाली नासरेथास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. येशू ज्ञानाने, शरीराने आणि ‘देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला.’

लूक 2 वाचा

ऐका लूक 2