YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 18:31-43

लूक 18:31-43 MARVBSI

तेव्हा त्याने बारा जणांस जवळ घेऊन त्यांना म्हटले, “पाहा, आपण वर यरुशलेमेस चाललो आहोत, आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्याच्या द्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत. म्हणजे त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील आणि तो तिसर्‍या दिवशी पुन्हा उठेल.” त्यांना ह्या गोष्टींपैकी काहीच कळले नाही, आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या. तो यरीहोजवळ आला तेव्हा असे झाले की, एक आंधळा वाटेवर भीक मागत बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, “हे काय आहे?” त्यांनी त्याला सांगितले, “येशू नासरेथकर जवळून जात आहे.” तेव्हा तो ओरडून म्हणाला, “अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणार्‍यांनी त्याला दटावले; तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा.” तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे?” तो म्हणाला, “प्रभो, मला पुन्हा दृष्टी यावी.” येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी येवो. तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा गौरव करत त्याच्यामागे चालू लागला; तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले.