कोणाएका अधिकार्याने त्याला विचारले, “अहो उत्तम गुरूजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?” येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊक आहेत : ‘व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर.’ तो म्हणाला, “मी आपल्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळत आलो आहे.” हे ऐकून येशूने त्याला म्हटले, “अद्यापि तुझ्यात एक गोष्ट उणी आहे; तुझे असेलनसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.” पण हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता. तो अतिशय खिन्न झाला हे पाहून येशू म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे! श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे ह्यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.” ज्यांनी हे ऐकले ते म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” तो म्हणाला, “ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.” तेव्हा पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आपले घरदार सोडून तुम्हांला अनुसरलो आहोत.” त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचीत सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, बायको, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडली आहेत, त्याला ह्या काळात पुष्कळ पटीने, व येणार्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही.”
लूक 18 वाचा
ऐका लूक 18
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 18:18-30
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ