मग असे झाले की, तो यरुशलेमेकडे चालला असता शोमरोन व गालील ह्यांमधून गेला.
आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्याला भेटण्यास आले.
ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, “अहो येशू, गुरूजी, आमच्यावर दया करा.”
त्याने त्यांना पाहून म्हटले, “तुम्ही जाऊन स्वतःस ‘याजकांना दाखवा.”’ मग असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले.
त्यांच्यातील एक जण आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णत परत आला;
आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला; हा तर शोमरोनी होता.
तेव्हा येशूने म्हटले, “दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊ जण कोठे आहेत?
ह्या परक्यावाचून देवाचा गौरव करण्यास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय?”
तेव्हा त्याने म्हटले, “ऊठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
देवाचे राज्य केव्हा येईल असे परूश्यांनी विचारले असता त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही;
‘पाहा, ते येथे आहे! किंवा तेथे आहे!’ असे म्हणणार नाहीत, कारण पाहा, देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.”
त्यावर त्याने शिष्यांना म्हटले, “असे दिवस येणार आहेत की, मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा कराल पण तो तुम्हांला दिसणार नाही.
ते तुम्हांला म्हणतील, ‘पाहा, तो तेथे आहे! पाहा, येथे आहे!’ तर तुम्ही जाऊ नका व त्यांच्यामागे लागू नका;
कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूस चमकून दुसर्या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या दिवशी होईल.
तथापि त्याने प्रथम फार दुःख भोगावे व ह्या पिढीकडून नाकारले जावे ह्याचे अगत्य आहे.
नोहाच्या दिवसांत झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतही होईल.
‘नोहा तारवात गेला’ आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करत होते व लग्न करून देत होते.
तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसांत झाले, त्याप्रमाणे होईल; म्हणजे ते लोक खातपीत होते, विकत घेत होते, विकत होते, लागवड करत होते, घरे बांधत होते;
परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी ‘आकाशातून अग्नी व गंधक ह्यांची वृष्टी होऊन’ सर्वांचा नाश झाला.
मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी असेच होईल.
त्या दिवशी जो धाब्यावर असेल त्याने आपले घरात असलेले सामान नेण्याकरता खाली येऊ नये आणि तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी ‘मागे फिरू नये.’
लोटाच्या बायकोची आठवण करा.
जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील तो आपल्या जिवाला मुकेल, आणि जो कोणी आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.
मी तुम्हांला सांगतो, त्या रात्री एका बाजेवर दोघे असतील, एक घेतला जाईल व दुसरा तेथेच ठेवला जाईल.
दोघी मिळून दळत असतील, एक घेतली जाईल व दुसरी तेथेच ठेवली जाईल.”1
त्यांनी त्याला म्हटले, “प्रभूजी, कोठे?” त्याने त्यांना म्हटले, “जेथे प्रेत आहे तेथे गिधाडे जमतील.”