YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 17:1-19

लूक 17:1-19 MARVBSI

मग त्याने शिष्यांना म्हटले, “अडखळणे येऊ नयेत हे अशक्य आहे; परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार! त्याने ह्या लहानांतील एकाला अडखळण करावे ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकावे ह्यात त्याचे हित आहे. तुम्ही स्वत: सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्‍चात्ताप केला तर त्याला क्षमा कर. त्याने दिवसातून सात वेळा तुझा अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, ‘मला पश्‍चात्ताप झाला आहे,’ असे म्हटले तरी त्याला क्षमा कर.” मग प्रेषित प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढवा.” प्रभू म्हणाला, “तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल, तर ह्या तुतीला, ‘तू मुळांसकट उपटून समुद्रात लावली जा,’ असे तुम्ही सांगताच ती तुमचे ऐकेल. तुमच्यापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल, ‘आताच येऊन जेवायला बस.’ उलट ‘माझे जेवण तयार कर, माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर, आणि मग तू खा व पी,’ असे तो त्याला म्हणणार नाही काय? सांगितलेली कामे दासाने केली म्हणून तो त्याचे उपकार मानतो काय? त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा.” मग असे झाले की, तो यरुशलेमेकडे चालला असता शोमरोन व गालील ह्यांमधून गेला. आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले दहा पुरुष त्याला भेटण्यास आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, “अहो येशू, गुरूजी, आमच्यावर दया करा.” त्याने त्यांना पाहून म्हटले, “तुम्ही जाऊन स्वतःस ‘याजकांना दाखवा.”’ मग असे झाले की, ते जाता जाता शुद्ध झाले. त्यांच्यातील एक जण आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णत परत आला; आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणांवर पालथा पडला; हा तर शोमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, “दहाचे दहा शुद्ध झाले होते ना? मग नऊ जण कोठे आहेत? ह्या परक्यावाचून देवाचा गौरव करण्यास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय?” तेव्हा त्याने म्हटले, “ऊठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”

संबंधित व्हिडिओ