YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 15:11-31

लूक 15:11-31 MARVBSI

आणखी तो म्हणाला, “कोणाएका मनुष्याला दोन मुलगे होते; त्यांपैकी धाकटा बापाला म्हणाला, ‘बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या.’ तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्वकाही जमा करून दूर देशी निघून गेला; आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला; तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतांत डुकरे चारण्यास पाठवले. तेव्हा डुकरे खात असत त्यांतल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई; त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, ‘माझ्या बापाच्या कितीतरी मोलकर्‍यांना भाकरीची रेलचेल आहे! आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे; आता तुमचा मुलगा म्हणवून घ्यायला मी योग्य नाही; आपल्या एका मोलकर्‍याप्रमाणे मला ठेवा.’ मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, ‘बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे; आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही.’ पण बापाने आपल्या दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला, आणि पुष्ट वासरू आणून कापा; आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू; कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.’ मग ते आनंदोत्सव करू लागले. त्याचा वडील मुलगा शेतात होता; तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकरास बोलावून विचारले, ‘हे काय चालले आहे?’ त्याने त्याला सांगितले, ‘तुमचा भाऊ आला आहे; आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे.’ तेव्हा तो रागावला व आत जाईना; म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला; परंतु त्याने बापाला उत्तर दिले, ‘पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करत आहे, आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही; तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिणींबरोबर खाऊन टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले.’ त्याने त्याला म्हटले, ‘बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस, आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे.