तेव्हा लोकसमुदाय त्याच्याजवळ एकत्र जमत असताना तो असे म्हणू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्ह मागते; परंतु योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही.
कारण जसा योना निनवेकरांना चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल.
दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील; कारण शलमोनाचे ज्ञान ऐकण्यास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली; आणि पाहा, शलमोनापेक्षा थोर असा एक येथे आहे.
निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील; कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला; आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे.
दिवा लावून तळघरात किंवा मापाखाली कोणी ठेवत नाही, तर आत येणार्यांना उजेड दिसावा म्हणून दिवठणीवर ठेवतो.
तुझ्या शरीराचा दिवा तुझा डोळा होय; तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे सर्व शरीर प्रकाशमय असते; सदोष असला तर तुझे शरीरही अंधकारमय असते.
म्हणून तुझ्यामधील प्रकाश अंधार तर नाही ना, हे पाहा.
तुझे सर्व शरीर प्रकाशमय असेल आणि त्याचा कोणताही भाग अंधकारमय नसेल, तर दिवा आपल्या उज्ज्वल ज्योतीने तुला प्रकाशमय करतो त्याप्रमाणे ते पूर्णपणे प्रकाशमय होईल.”
तो बोलत आहे इतक्यात एका परूश्याने त्याला आपल्याकडे भोजनास येण्याची विनंती केली; मग तो आत जाऊन भोजनास बसला.
त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाहीत असे पाहून परूश्याला आश्चर्य वाटले.
परंतु प्रभूने त्याला म्हटले, “तुम्ही परूशी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करता; पण तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा ह्यांनी भरला आहे.
अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बहिर्भाग केला, त्याने अंतर्भागही केला नाही काय?
तर जे आत आहे त्याचा2 दानधर्म करा म्हणजे पाहा, सर्व तुम्हांला शुद्ध आहे.
परंतु तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही पुदिना, सताप व प्रत्येक भाजी ह्यांचा दशांश देता, पण न्याय व देवाची प्रीती ह्यांकडे दुर्लक्ष करता; ह्या गोष्टी करायच्या होत्या, व त्या सोडायच्या नव्हत्या.
तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण सभास्थानांत श्रेष्ठ आसने व बाजारांत नमस्कार घेणे तुम्हांला आवडते.
अहो शास्त्र्यांनो व परूश्यांनो, अहो ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही न दिसणार्या कबरांसारखे आहात, त्यांच्यावरून माणसे न समजता चालतात.”
तेव्हा शास्त्र्यांपैकी कोणीएकाने त्याला म्हटले, “गुरूजी, तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करता.”
तो म्हणाला, “तुम्हा शास्त्र्यांचीही केवढी दुर्दशा होणार! कारण वाहण्यास अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोटदेखील त्या ओझ्यांना लावत नाही.
तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जिवे मारले!
तुम्ही साक्षीदार आहात व आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यांना जिवे मारले व तुम्ही त्यांची थडगी बांधता.
ह्या कारणास्तव देवाच्या ज्ञानानेही म्हटले, ‘मी त्यांच्याकडे संदेष्टे व प्रेषित पाठवीन, आणि त्यांच्यातील कित्येकांना ते जिवे मारतील व कित्येकांना छळतील;
ह्यासाठी की, जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्ट्यांचे रक्त,
म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून वेदी व पवित्रस्थान ह्यांच्यामध्ये ज्या जखर्याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडले गेले त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जावा. होय, मी तुम्हांला सांगतो, त्याचा हिशेब ह्या पिढीपासून घेतला जाईलच.
तुम्हा शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेलात; तुम्ही स्वतः आत गेला नाहीत व जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला.”
तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री व परूशी त्याच्या अंगावर त्वेषाने येऊन त्याने पुष्कळशा गोष्टींविषयी बोलावे म्हणून त्याला डिवचू लागले;
आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात धरून दोषी ठरवावे म्हणून ते टपून राहिले.