YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 10:25-42

लूक 10:25-42 MARVBSI

मग पाहा, कोणीएक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हणाला, “गुरूजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?” त्याने त्याला म्हटले, “नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वाचनात काय आले आहे?” त्याने उत्तर दिले, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने ‘प्रीती कर;’ आणि ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर.”’ त्याने त्याला म्हटले, “ठीक उत्तर दिलेस; हेच कर म्हणजे जगशील.” परंतु स्वतःस नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण?” येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरीहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला; त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता; तो त्याला पाहून दुसर्‍या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसर्‍या बाजूने चालता झाला. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता, तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्याला त्याचा कळवळा आला; त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले व त्याची काळजी घेतली. दुसर्‍या दिवशी त्याने दोन रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ‘ह्याची काळजी घ्या; आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हांला देईन.’ तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला?” तो म्हणाला, “त्याच्यावर दया करणारा तो.” येशूने त्याला म्हटले, “जा आणि तूही तसेच कर.” मग ते पुढे जात असता तो एका गावात आला; तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरीया नावाची एक बहीण होती; तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, “प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला साहाय्य करायला तिला सांगा.” प्रभूने तिला उत्तर दिले, “मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस; परंतु थोडक्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”

संबंधित व्हिडिओ