YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 1:16-38

लूक 1:16-38 MARVBSI

तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना त्यांचा देव प्रभू ह्याच्याकडे वळवील. ‘बापाची अंतःकरणे मुलांकडे’, व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलीयाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल.” तेव्हा जखर्‍या देवदूताला म्हणाला, “हे मी कशावरून समजू? कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नीही वयातीत आहे.” देवदूताने त्याला उत्तर दिले, “मी देवासमोर उभा राहणारा गब्रीएल आहे; आणि तुझ्याबरोबर बोलण्यास व ही सुवार्ता तुला कळवण्यास मला पाठवण्यात आले आहे. पाहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही; कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाहीस.” इकडे लोक जखर्‍याची वाट पाहत होते व त्याला पवित्रस्थानात उशीर लागल्यामुळे त्यांना आश्‍चर्य वाटले. तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईना; तेव्हा त्याला पवित्रस्थानात दर्शन झाले आहे असे त्यांनी ओळखले; तो त्यांना खुणा करत होता. तो तसाच मुका राहिला. मग त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी गेला. त्या दिवसांनंतर त्याची पत्नी अलीशिबा गरोदर राहिली आणि पाच महिने एकान्तात राहिली; ती म्हणत असे की, “लोकांत माझा होणारा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्यासाठी त्याने असे केले.” नंतर सहाव्या महिन्यात देवाने गालीलातील नासरेथ नावाच्या गावी एका कुमारीकडे गब्रीएल देवदूताला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती; आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, “हे कृपा पावलेल्या स्त्रीये, कल्याण असो; प्रभू तुझ्याबरोबर असो.”1 ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, “मरीये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पाहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल; आणि तो याकोबाच्या घराण्यावर ‘युगानुयुग राज्य करील’, व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” मरीयेने देवदूताला म्हटले, “हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही.” देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील. पाहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे; आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण ‘देवाला काहीच अशक्य होणार नाही.” तेव्हा मरीया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची दासी; आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.

लूक 1 वाचा

ऐका लूक 1