YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 1:1-23

लूक 1:1-23 MARVBSI

ज्या गोष्टींसंबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खातरी झाली आहे, त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक ह्यांनी आम्हांला सांगून ठेवलेला वृत्तान्त लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे; ह्यास्तव, थियफील महाराज, मलाही वाटले की, सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्यात; ह्यासाठी की, ज्या वचनांचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्यांचा निश्‍चितपणा आपल्या लक्षात यावा. यहूदीयाचा राजा हेरोद ह्याच्या दिवसांत अबीयाच्या वर्गातील जखर्‍या नावाचा कोणीएक याजक होता; त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलीशिबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती. अलीशिबा वांझ असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते; ती उभयता वयातीतही झाली होती. एकदा असे झाले की, तो आपल्या वर्गाच्या अनुक्रमाने देवापुढे आपले याजकाचे काम करत असता, याजकपणाच्या परिपाठाप्रमाणे प्रभूच्या पवित्रस्थानात जाऊन धूप जाळण्याचे काम त्याच्याकडे आले. धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करत होता. तेव्हा प्रभूचा दूत धूपवेदीच्या उजव्या बाजूस उभा राहिलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून जखर्‍या अस्वस्थ व भयभीत झाला. देवदूताने त्याला म्हटले, “जखर्‍या, भिऊ नकोस, कारण तुझी विनंती ऐकण्यात आली आहे; तुझी पत्नी अलीशिबा हिच्यापासून तुला मुलगा होईल आणि तू त्याचे नाव योहान ठेव. त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्लास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील. कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल. तो ‘द्राक्षारस व मद्य कधीच प्राशन करणार नाही’; आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना त्यांचा देव प्रभू ह्याच्याकडे वळवील. ‘बापाची अंतःकरणे मुलांकडे’, व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी म्हणून तो एलीयाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्यापुढे चालेल.” तेव्हा जखर्‍या देवदूताला म्हणाला, “हे मी कशावरून समजू? कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नीही वयातीत आहे.” देवदूताने त्याला उत्तर दिले, “मी देवासमोर उभा राहणारा गब्रीएल आहे; आणि तुझ्याबरोबर बोलण्यास व ही सुवार्ता तुला कळवण्यास मला पाठवण्यात आले आहे. पाहा, हे घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील, तुला बोलता येणार नाही; कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनांवर तू विश्वास ठेवला नाहीस.” इकडे लोक जखर्‍याची वाट पाहत होते व त्याला पवित्रस्थानात उशीर लागल्यामुळे त्यांना आश्‍चर्य वाटले. तो बाहेर आल्यावर त्याला त्यांच्याबरोबर बोलता येईना; तेव्हा त्याला पवित्रस्थानात दर्शन झाले आहे असे त्यांनी ओळखले; तो त्यांना खुणा करत होता. तो तसाच मुका राहिला. मग त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी गेला.

लूक 1 वाचा

ऐका लूक 1