लेवीय 3
3
शांत्यर्पणे
1कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करायचा असेल व तो गुराढोरांचा करायचा असेल तर यज्ञपशू नर असो किंवा मादी असो, तो दोषहीन असा पाहून परमेश्वरासमोर अर्पावा.
2त्याने आपल्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दाराशी त्याचा वध करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.
3परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या ज्या भागाचा होम करायचा तो भाग हा : आतड्यांवर असलेली चरबी व त्यांना लागून असलेली सर्व चरबी, 4दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही त्याने वेगळी करावीत.
5हे सर्व घेऊन अहरोनाच्या मुलांनी वेदीवर, विस्तवावर रचलेल्या लाकडांवरील होमार्पणावर त्याचा होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय.
6परमेश्वराप्रीत्यर्थ कोणाला शांत्यर्पणाच्या यज्ञासाठी शेरडामेंढरांचे अर्पण आणायचे असेल, ते नर असो किंवा मादी असो, त्याने ते दोषहीन असे पाहून आणावे.
7त्याला कोकराचे अर्पण करायचे असेल तर ते त्याने परमेश्वरासमोर अर्पावे.
8त्याने त्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा, आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.
9परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या ज्या भागाचा होम करायचा तो भाग हा : त्याची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आतड्यांवर असलेली चरबी,
10दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावीत;
11आणि ह्याचा याजकाने वेदीवर होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्यान्न होय.
12कोणाला बकर्याचे अर्पण करायचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर अर्पावे.
13त्याने त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपासमोर त्याचा वध करावा; आणि अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.
14ह्या बलीच्या ज्या भागाचा परमेश्वराप्रीत्यर्थ होम करायचा तो भाग हा : आतड्यांवर असलेली चरबी, त्यांना लागून असलेली सर्व चरबी,
15दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी आणि गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावीत;
16आणि याजकाने वेदीवर त्यांचा होम करावा. हे सुवासिक हव्यान्न होय; कारण चरबी म्हणून जेवढी असेल तेवढी परमेश्वराची आहे.
17तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये, हा तुम्हांला तुमच्या सर्व निवासस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या निरंतरचा निर्बंध होय.”
सध्या निवडलेले:
लेवीय 3: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.