सीनाय पर्वतावर परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना असे सांग : मी तुम्हांला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहचल्यावर त्या देशाने परमेश्वराप्रीत्यर्थ शब्बाथ पाळावा. सहा वर्षे आपली शेती करावी आणि सहा वर्षे द्राक्षमळ्याची छाटणी करून त्याचे पीक जमा करावे; पण सातव्या वर्षी देशाला परमविश्रामाचा शब्बाथ असावा; म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ शब्बाथ असावा; त्या वर्षी तू शेतात पेरणी करू नये आणि द्राक्षमळ्याची छाटणी करू नये. आपोआप उगवलेले धान्य कापू नये आणि न छाटलेल्या द्राक्षवेलीची फळे तोडू नयेत; देशाच्या परमविश्रामाचे ते वर्ष असावे. देशाच्या शब्बाथाच्या उपजावर तुमचा, तुमच्या दासदासींचा, तुमच्या मजुरांचा व तुमच्याबरोबर राहणार्या परदेशीयांचा निर्वाह होईल; तुमचे पशू व तुमच्या देशातील जनावरे ह्यांना देशाचे सर्व उत्पन्न खायला मिळेल. सात शब्बाथवर्षे म्हणजे सात गुणिले सात एवढी वर्षे मोजा; ह्या सात शब्बाथवर्षांचा काळ एकोणपन्नास वर्षे होय. मग सातव्या महिन्याच्या दशमीस म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी मोठ्या आवाजाचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे. त्या पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी; ह्या वर्षाला तुम्ही योबेल1 म्हणावे; ह्या वर्षी तुम्ही आपापल्या वतनात व आपापल्या कुटुंबात परत जावे. हे पन्नासावे वर्ष तुमचे योबेलवर्ष होय; त्या वर्षी तुम्ही काही पेरू नये, आपोआप उगवलेले कापू नये, आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही तोडू नयेत, कारण हे योबेलवर्ष होय; हे तुम्हांला पवित्र असावे; शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा. ह्या योबेलवर्षी तुम्ही सर्वांनी आपापल्या वतनात परत जावे. तुम्ही आपल्या शेजार्याला काही विकाल किंवा त्याच्याकडून काही विकत घ्याल तेव्हा एकमेकांवर अन्याय करू नका. योबेलवर्षानंतर जितकी वर्षे झाली असतील त्यांच्या संख्येप्रमाणे आपल्या शेजार्यापासून मोल घ्यावे, व तितक्या वर्षांच्या उत्पन्नानुसार त्यांनी विक्री करावी. उरलेल्या वर्षांची संख्या अधिक असली तर त्या मानाने मोल वाढवावे आणि कमी असली तर त्या मानाने मोल कमी करावे, कारण जितकी पिके झाली असतील त्यांच्या हिशोबाने त्यांनी ती विक्री करावी. तुम्ही एकमेकांवर अन्याय करू नये, तर आपल्या देवाचे भय बाळगावे. कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे. ह्याकरता तुम्ही माझे विधी आचरावेत आणि माझे नियम लक्षपूर्वक पाळावेत; असे केल्याने तुम्ही देशात सुरक्षित राहाल. देश आपला उपज देईल, तुम्ही पोटभर खाल आणि त्यात तुम्ही सुरक्षित राहाल. तुम्ही कदाचित म्हणाल, ‘सातव्या वर्षी आम्ही काही पेरायचे नाही व शेताचे उत्पन्न जमा करायचे नाही तर मग आम्ही त्या वर्षी काय खावे?’ पण सहाव्या वर्षी मी तुम्हांला अशी बरकत देईन की जमीन तुम्हांला तीन वर्षांचे उत्पन्न देईल. मग आठव्या वर्षी तुम्ही पेराल आणि जुना साठा खात राहाल; नवव्या वर्षाचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल. जमीन विकायची तर ती कायमची विकून टाकू नका, कारण जमीन माझी असून तुम्ही माझ्या आश्रयाला परके व उपरे आहात
लेवीय 25 वाचा
ऐका लेवीय 25
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लेवीय 25:1-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ