YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 24:1-9

लेवीय 24:1-9 MARVBSI

परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना आज्ञा कर की, दीप सतत तेवत राहून उजेड मिळावा म्हणून जैतुनाचे हातकुटीचे निरे तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे. अहरोनाने दर्शनमंडपात साक्षीच्या कोशाजवळ असलेल्या अंतरपटाबाहेर परमेश्वरासमोर नित्य संध्याकाळ-पासून सकाळपर्यंत त्याची व्यवस्था ठेवावी; हा तुमचा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. त्याने परमेश्वरासमोर शुद्ध दीपवृक्षावरील दिव्यांची व्यवस्था नित्य ठेवावी. तू सपीठ घेऊन त्याच्या बारा पोळ्या भाज; एक पोळी दोन दशमांश एफाभर सपिठाची करावी. त्यांच्या दोन रांगा करून एका रांगेत सहा-सहा पोळ्या शुद्ध सोन्याच्या मेजावर परमेश्वरासमोर ठेवाव्यात. प्रत्येक रांगेवर शुद्ध धूप ठेव म्हणजे तो त्या भाकरीचे परमेश्वराला स्मरण देणारे हव्य होईल. दर शब्बाथवारी त्याने परमेश्वरासमोर त्या नित्यनेमाने मांडाव्यात; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय. ही भाकर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा वाटा होय; त्यांनी ती पवित्र स्थळी खावी; कारण निरंतरच्या विधीप्रमाणे परमेश्वराला अर्पण केलेल्या हव्यांपैकी ती त्याला परमपवित्र होय.”