YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 16:1-22

लेवीय 16:1-22 MARVBSI

अहरोनाचे दोघे मुलगे परमेश्वरासमोर गेल्यामुळे मृत्यू पावल्यानंतर परमेश्वर मोशेशी बोलला. परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याला सांग की, तू भलत्या वेळी पवित्रस्थानात अंतरपटाच्या आत कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नयेस, गेलास तर मरशील, कारण दयासनावरील मेघात मी दर्शन देत जाईन. अहरोनाने पवित्रस्थानात प्रवेश करावा तो ह्याप्रमाणे : त्याने पापार्पणासाठी एक गोर्‍हा व होमार्पणासाठी एक मेंढा घेऊन यावे. त्याने तागाचा पवित्र अंगरखा घालावा; तागाचा चोळणा आपल्या अंगात घालावा; तागाच्या कमरबंदाने आपली कंबर कसावी आणि तागाचा मंदील घालावा; ही पवित्र वस्त्रे होत. त्याने पाण्याने स्नान करून ही वस्त्रे परिधान करावीत. मग त्याने इस्राएलाच्या मंडळीकडून पापार्पणासाठी दोन बकरे व होमार्पणासाठी एक मेंढा घ्यावा. अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोर्‍हा सादर करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी अर्पून प्रायश्‍चित्त करावे. मग त्याने ते दोन बकरे घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर उभे करावेत. अहरोनाने त्या दोन बकर्‍यांवर चिठ्ठ्या टाकाव्यात; एक चिठ्ठी परमेश्वरासाठी व दुसरी पाप वाहून नेण्यासाठी.1 ज्या बकर्‍यावर परमेश्वराच्या नावाची चिठ्ठी निघेल तो अहरोनाने सादर करून पापार्पणादाखल बळी द्यावा. पण ज्या बकर्‍यावर पाप वाहून नेण्यासंबंधीची चिठ्ठी निघेल त्याला परमेश्वरासमोर जिवंत उभे करावे व त्याच्या द्वारे प्रायश्‍चित्त व्हावे, आणि तो बकरा पाप वाहून नेण्यासाठी रानात सोडून द्यावा. अहरोनाने स्वतःसाठी पापार्पणाचा गोर्‍हा सादर करावा आणि त्याचा वध करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी प्रायश्‍चित्त करावे; आणि परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखार्‍यांनी भरलेले धूपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटाच्या आत आणावा; तो धूप परमेश्वरासमोर अग्नीवर असा घालावा की, त्याच्या धुराने साक्षपटावरील दयासनाला व्यापून टाकावे, म्हणजे तो मरायचा नाही. मग त्याने गोर्‍ह्याचे थोडे रक्त घेऊन दयासनाच्या पूर्वेकडील बाजूला बोटाने शिंपडावे, आणि थोडे रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे. मग त्याने लोकांसाठी आणलेल्या पापार्पणाच्या बकर्‍याचा वध करावा; त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि जसे त्याने गोर्‍ह्याच्या रक्ताचे केले तसेच बकर्‍याच्या रक्ताचे करावे, म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे. आणखी त्याने इस्राएल लोकांची अशुद्धता आणि अपराध ह्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या एकंदर पापांबद्दल पवित्रस्थानासाठी प्रायश्‍चित्त करावे; लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त होऊन त्यांच्याबरोबर वसत असलेल्या दर्शन-मंडपासाठी त्याने तसेच करावे. अहरोन प्रायश्‍चित्त करण्यासाठी पवित्रस्थानात प्रवेश करील तेव्हापासून तो स्वतःसाठी, स्वतःच्या घराण्यासाठी आणि इस्राएलाच्या सर्व मंडळीसाठी प्रायश्‍चित्त करून बाहेर येईपर्यंत दर्शनमंडपात दुसरे कोणीही नसावे. मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीजवळ जाऊन तिच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे; गोर्‍ह्याचे थोडे रक्त आणि बकर्‍याचे थोडे रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूंच्या शिंगांना लावावे, आणि थोडे रक्त घेऊन त्याने आपल्या बोटाने सात वेळा तिच्यावर शिंपडून ती इस्राएल लोकांच्या अशुद्धतेपासून शुद्ध व पवित्र करावी. नंतर पवित्रस्थान, दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करण्याचे संपवल्यावर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा. अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकर्‍याच्या डोक्यावर ठेवून इस्राएल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध ह्यांचा म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करावा; व ती त्या बकर्‍याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे. तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन प्रदेशात वाहून नेईल; त्या मनुष्याने त्या बकर्‍याला रानात सोडून द्यावे.