लेवीय 13
13
महारोग व कातडीचे रोग ह्यांसंबंधीचे नियम
1परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना सांगितले, 2“एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद अथवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाचा चट्टा असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजकपुत्रांपैकी एकाकडे न्यावे;
3मग याजकाने त्याच्या अंगाच्या कातडीवरील तो चट्टा तपासावा आणि त्या चट्ट्यावरील केस पांढरे झाले असल्यास, आणि तो चट्टा कातडीपेक्षा खोल गेलेला दिसल्यास, तो महारोगाचा चट्टा समजावा; अशा प्रकारे त्या मनुष्याची तपासणी करून याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे;
4पण त्याच्या अंगाच्या कातडीवरील डाग पांढरा असला व त्याच्या कातडीपेक्षा तो खोल गेलेला नसला व त्यावरचे केस पांढरे झालेले नसतील, तर याजकाने चट्टा पडलेल्या त्या माणसाला सात दिवस कोंडून ठेवावे;
5मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि तो चट्टा तसाच असून कातडीत पसरला नाही असे त्याला दिसून आले तर याजकाने त्याला आणखी सात दिवस कोंडून ठेवावे;
6मग सातव्या दिवशी याजकाने पुन्हा त्याची तपासणी करावी आणि चट्टा बुजत चालला असल्यास व तो कातडीत पसरला नसल्यास याजकाने त्याला शुद्ध ठरवावे. ते साधे खवंद होय; त्या माणसाने आपली वस्त्रे धुऊन शुद्ध व्हावे.
7तरीपण त्या मनुष्याने स्वतःला शुद्ध ठरवण्यासाठी याजकाला दाखवल्यानंतर त्याच्या कातडीवरील ते खवंद पसरत गेले असल्यास त्याने पुन्हा याजकापुढे हजर व्हावे.
8याजकाने तपासणी करावी आणि ते खवंद कातडीत पसरल्याचे दिसून आल्यास त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोग होय.
9एखाद्या मनुष्याला महारोगाचा चट्टा असल्यास त्याला याजकाकडे न्यावे;
10याजकाने तपासणी करावी आणि जर त्याच्या कातडीला पांढरी सूज आली असली व त्यामुळे तेथील केस पांढरे झाले असतील व सुजेच्या ठिकाणाचे मांस नाजूक झालेले असेल,
11तर त्याच्या कातडीतला तो जुनाट महारोग होय; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; त्याला त्याने कोंडून ठेवू नये; कारण तो अशुद्धच होय.
12एखाद्याच्या कातडीला कोड फुटून ते नखशिखांत सर्व कातडीवर पसरले आहे असे याजकाला दिसून आले,
13तर त्याने तपासणी करावी आणि त्याच्या सर्वांगास कोड झाले असल्यास त्याने त्या चट्टा पडलेल्या मनुष्याला शुद्ध ठरवावे; त्याचे सर्वांग शुभ्र झाले आहे, म्हणजेच तो शुद्ध होय.
14पण जर त्याच्या अंगावर काही मांस कोवळे दिसून आले तर तो अशुद्ध समजावा.
15याजकाने कोवळे मांस पाहून त्याला अशुद्ध ठरवावे; असले कोवळे मांस अशुद्धच असते; तो महारोग होय.
16पण ते कोवळे मांस फिरून पांढरे झाले तर त्याने पुन्हा याजकाकडे यावे;
17याजकाने त्याची तपासणी करावी, आणि जर त्याचा चट्टा फिरून पांढरा झाला असेल, तर त्याने त्या चट्टा पडलेल्या माणसाला शुद्ध ठरवावे; तो शुद्ध होय.
18कोणाच्या कातडीला फोड येऊन तो बरा झाला,
19व फोडाच्या जागी पांढरी सूज आली अथवा तांबूस तकतकीत डाग पडला तर त्याने तो याजकाला दाखवावा;
20याजकाने तपासणी करावी आणि जर कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे झालेले असले, तर त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्टा होय.
21पण तपासाअंती त्यावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही आणि ती बुजत चालली आहे असे याजकाला दिसून आले, तर त्याने त्या मनुष्याला सात दिवस कोंडून ठेवावे.
22तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; तो रोगाची लागण आहे.
23तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून पसरला नाही तर तो फोडाचा वण आहे; म्हणून याजकाने त्या मनुष्याला शुद्ध ठरवावे.
24एखाद्याच्या कातडीत जळल्याचा वण असेल व त्या वणाच्या कोवळ्या मांसात तांबूस तकतकीत किंवा नुसता पांढरा डाग दिसून येईल,
25तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली असेल तर त्या जळालेल्या भागी महारोग फुटला आहे; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय.
26पण तपासाअंती त्या तकतकीत डागावरचे केस पांढरे झालेले नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली नाही, आणि ती बुजत चालली आहे असे याजकाला दिसून आले, तर त्याने त्याला सात दिवस कोंडून ठेवावे;
27सातव्या दिवशी त्याने त्याची तपासणी करावी आणि तो कातडीवर पसरत गेला आहे असे दिसले तर याजकाने त्या मनुष्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय.
28तो तकतकीत डाग तेथल्या तेथेच राहून कातडीवर पसरला नाही व तो बुजत चालला आहे असे दिसून आल्यास ती जळालेल्या जागेची सूज आहे म्हणून याजकाने त्याला शुद्ध ठरवावे; तो त्या जळालेल्या जागेवरचा वण होय.
29एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या डोक्यावर अथवा हनुवटीवर चट्टा असेल,
30तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि ती जागा कातडीपेक्षा खोल दिसली व तिच्यावर काही पिंगट बारीक केस असले, तर त्याने त्या व्यक्तीला अशुद्ध ठरवावे; ही चाई डोक्याचा अथवा हनुवटीचा महारोग होय.
31याजकाने हा चाईचा चट्टा तपासून पाहावा व तो कातडीपेक्षा खोल नसला व त्याच्यावर काळे केस नसले तर चाईचा चट्टा असलेल्या त्या मनुष्याला त्याने सात दिवस कोंडून ठेवावे;
32सातव्या दिवशी त्याने ह्या चट्ट्याची तपासणी करावी; ती चाई पसरली नाही, त्या जागी काही पिंगट केस नाहीत व ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली नाही,
33तर त्या मनुष्याने मुंडण करावे; पण चाईवरचे केस काढून नयेत; याजकाने त्या चाई असलेल्या मनुष्याला आणखी सात दिवस कोंडून ठेवावे.
34सातव्या दिवशी याजकाने ती चाई पुन्हा तपासून पाहावी, आणि चाई कातडीवर पसरलेली नसली व कातडीपेक्षा ती खोल गेलेली नसली तर त्याने त्याला शुद्ध ठरवावे; त्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत व शुद्ध व्हावे.
35तरीपण तो शुद्ध ठरल्यानंतर ती चाई पसरत गेली,
36तर याजकाने त्याला तपासावे व ती चाई कातडीवर पसरलेली दिसली तर पिंगट केस शोधत न बसता त्या मनुष्याला अशुद्ध ठरवावे.
37परंतु ती चाई होती तेवढीच असून तिच्यावर काळे केस आले आहेत असे त्याला दिसून आले, तर ती चाई बरी झाली असून तो शुद्ध होय; याजकाने त्याला शुद्ध ठरवावे.
38कोणा पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या अंगावर तकतकीत डाग म्हणजे पांढरे तकतकीत डाग असले,
39तर याजकाने ते तपासावेत व त्याच्या अंगावरील कातडीतले ते तकतकीत डाग करडे असले तर ती कातडीवर फुटलेली दाद होय; तो मनुष्य शुद्ध होय.
40कोणा मनुष्याच्या डोक्याचे केस गळून त्याला टक्कल पडले तरी तो शुद्ध होय.
41त्याच्या कपाळाच्या वरच्या भागाचे केस गळून त्याला टक्कल पडले असले तरी तो शुद्ध होय.
42तथापि त्या टक्कल पडलेल्या डोक्यावरच्या किंवा कपाळावरच्या भागावर तांबूस पांढरा चट्टा पडला असेल तर त्या टक्कल पडलेल्या डोक्यावर किंवा कपाळावर महारोग फुटत आहे.
43मग याजकाने त्याला तपासावे आणि त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्यावरच्या किंवा कपाळावरच्या भागावर अंगावरील कातडीच्या महारोगासारखा वर आलेला तांबूस पांढरा चट्टा असल्याचे दिसले,
44तर तो मनुष्य महारोगी असून अशुद्ध होय; याजकाने त्याला अवश्य अशुद्ध ठरवावे; त्याच्या डोक्यावर पडलेला तो महारोगाचा चट्टा होय.
45ज्या महारोग्याच्या अंगावर हा चट्टा असेल त्याचे कपडे फाटके असावेत; त्याच्या डोक्याचे केस मोकळे सोडलेले असावेत, त्याने आपला वरचा ओठ झाकून ठेवावा आणि ‘अशुद्ध, अशुद्ध’ असे ओरडत जावे.
46जितके दिवस हा चट्टा त्याच्या अंगावर राहील तितके दिवस त्याने अशुद्ध राहावे; तो अशुद्ध होय, त्याने एकटे राहावे, छावणीच्या बाहेर त्याची वस्ती असावी.
47एखाद्या वस्त्राला, मग ते लोकरीचे असो की सणाचे असो, महारोगाचा चट्टा पडला,
48अथवा तो सणाच्या किंवा लोकरीच्या ताण्याला किंवा बाण्याला, चामड्याला किंवा चामड्यापासून बनवलेल्या वस्तूला पडला,
49आणि त्या वस्त्राला, त्याच्या ताण्याला किंवा त्याच्या बाण्याला अथवा चामड्याला किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूला पडलेला तो चट्टा हिरवट अथवा तांबूस असला, तर तो महारोगाचा चट्टा होय. तो याजकाला दाखवावा.
50याजकाने तो चट्टा तपासावा; चट्टा पडलेली वस्तू त्याने सात दिवस बंद करून ठेवावी;
51नंतर त्याने सातव्या दिवशी तो चट्टा तपासून पाहावा आणि वस्त्राच्या ताण्यावर किंवा बाण्यावर, चामड्यावर किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पसरलेला दिसला तर ते चढत जाणारे कुष्ठ समजावे; ती वस्तू अशुद्ध होय.
52ते वस्त्र लोकरीचे असो अथवा सणाचे असो, त्याच्या ताण्यावर किंवा बाण्यांवर, तसेच चामड्यावर किंवा चामड्याच्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा असला, तर ती वस्तू जाळावी; ते पसरत जाणारे कुष्ठ असल्यामुळे ती वस्तू अग्नीत जाळून टाकली पाहिजे.
53वस्त्रावर, ताण्यावर अथवा बाण्यावर किंवा चामड्याच्या केलेल्या एखाद्या वस्तूवर तो चट्टा पसरलेला नाही असे याजकाला तपासणीनंतर दिसून आले,
54तर चट्टा पडलेली वस्तू धुऊन टाकण्याची आज्ञा त्याने करावी आणि आणखी सात दिवस ती बंद करून ठेवावी.
55मग ती वस्तू धुतल्यावर याजकाने तपासावी आणि त्या चट्ट्याचा रंग बदलला नसून तो चट्टा पसरला नसला, तरी तो अशुद्ध समजावा; ती वस्तू अग्नीत जाळून टाकावी; तो चट्टा आतील बाजूस असो किंवा बाहेरील बाजूस असो, ते पसरत जाणारे कुष्ठ समजावे.
56पण धुतल्यानंतर तो चट्टा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले, तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा किंवा ताण्याचा किंवा बाण्याचा तेवढाच भाग फाडून काढावा;
57मग जर वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर अथवा त्याच्या बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर तो चट्टा पुन्हा फुटून निघाला, तर चट्टा फुटलेली ती वस्तू अग्नीत जाळून टाकावी.
58वस्त्र, त्याचा ताणा किंवा त्याचा बाणा किंवा चामड्याची कोणतीही वस्तू धुतल्यावर त्यावरील तो चट्टा नाहीसा झाला तर ती वस्तू पुन्हा एकदा धुवावी म्हणजे ती शुद्ध होईल.
59लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर अथवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरवण्याचा हा नियम होय.”
सध्या निवडलेले:
लेवीय 13: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.