अहरोनाचे मुलगे नादाब व अबीहू ह्यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यांत अग्नी घातला व त्यांवर धूप घालून तो अनधिकृत अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यांना भस्म केले; आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले. ह्या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वराने सांगितले ते हे : जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझा गौरव होईल.” तेव्हा अहरोन चूप राहिला. मग अहरोनाचा चुलता उज्जीयेल ह्याचे मुलगे मीशाएल व एलसाफान ह्यांना मोशेने बोलावून सांगितले की, “तुम्ही इकडे येऊन तुमच्या बांधवांना पवित्रस्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा.” मोशेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी येऊन त्यांच्या अंगरख्यांसहित त्यांना उचलून छावणीबाहेर नेले. मोशेने अहरोन आणि त्याचे मुलगे एलाजार व इथामार ह्यांना सांगितले की, “तुम्ही आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नका आणि आपली वस्त्रे फाडू नका; तसे कराल तर मराल आणि सर्व मंडळीवर कोप भडकेल; पण त्याने जो अग्नी पेटवला त्याबद्दल तुमच्या बांधवांनी म्हणजे सगळ्या इस्राएल घराण्याने विलाप करावा. तुम्ही दर्शनमंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये; गेलात तर मराल; कारण परमेश्वराने विहित केलेल्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” त्यांनी मोशेच्या सांगण्याप्रमाणे केले. आणखी परमेश्वराने अहरोनाला सांगितले, “जेव्हा जेव्हा तुम्ही, म्हणजे तू व तुझे मुलगे दर्शनमंडपात जाणार असाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस अथवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल; हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय; ह्या प्रकारे तुम्ही पवित्र व सामान्य, अशुद्ध व शुद्ध ह्यांमधील भेद जाणावा; आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांना कळवलेले सर्व विधी तुम्ही इस्राएल लोकांना शिकवावेत.”
लेवीय 10 वाचा
ऐका लेवीय 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लेवीय 10:1-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ