यहोशवाने मोठ्या पहाटेस उठून लोक जमवले. तो व इस्राएलाचे वडील जन लोकांच्या आघाडीवर आय नगराकडे निघाले. त्यांच्याबरोबर सर्व योद्धे चढाई करायला गेले, आणि आय नगराजवळ पोहचल्यावर त्यांनी त्यासमोर उत्तरेस तळ दिला; ते व आय नगर ह्यांच्यामध्ये एक खोरे होते. त्याने सुमारे पाच हजार पुरुष आय नगराच्या पश्चिमेस बेथेल व आय ह्यांच्या दरम्यान दबा धरायला ठेवले. ह्याप्रमाणे नगराच्या उत्तरेस कोणते सैन्य जायचे आणि पश्चिमेस कोणी दबा धरायचा हे ठरवून यहोशवा त्या रात्री खोर्यात राहिला. आयच्या राजाने हे पाहिले तेव्हा तो व त्याच्या नगरातले सगळे लोक पहाटेस लवकर उठून इस्राएलाशी सामना करायला अराबासमोरील उताराकडे गेले, पण नगराच्या पिछाडीस लोक आपणांवर दबा धरून आहेत हे त्यांच्या गावीही नव्हते. मग यहोशवा व सर्व इस्राएल त्यांच्यासमोर मोड झाल्याचे सोंग करून रानाच्या वाटेने पळू लागले. त्यांचा पाठलाग करण्यासाठी नगरातल्या सर्व लोकांना एकत्र बोलावण्यात आले; ते यहोशवाचा पाठलाग करत नगरापासून दूरवर गेले. इस्राएलाचा पाठलाग करायला निघाला नाही असा एकही पुरुष आय किंवा बेथेल येथे राहिला नाही; त्यांनी ते नगर मोकळे टाकून इस्राएलाचा पाठलाग केला. तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “तुझ्या हाती असलेली बरची आय नगराकडे उगार. कारण ते मी तुझ्या हाती देईन.” त्याप्रमाणे यहोशवाने आपल्या हाती असलेली बरची नगराकडे उगारली. त्याने आपला हात उगारताच दबा धरणार्यांनी लगबगीने उठून धावत जाऊन नगरात प्रवेश केला व ते काबीज केले आणि लगेच नगराला आग लावली. आय नगराच्या पुरुषांनी मागे वळून पाहिले तो नगराचा धूर आकाशात चढताना त्यांना दिसला, तेव्हा त्यांना इकडे किंवा तिकडे पळण्याची ताकद राहिली नाही; इकडे जे लोक रानाच्या मार्गाने पळत होते ते आपला पाठलाग करणार्यांवर उलटले. दबा धरणार्यांनी नगर हस्तगत केल्याचे व त्याचा धूर वर चढत असल्याचे यहोशवा व सर्व इस्राएलाने पाहिले तेव्हा ते मागे उलटून आयकरांवर तुटून पडले. त्यांच्याशी सामना करायला ती दुसरी टोळीही नगरातून निघाली; असे ते दोहो बाजूंनी इस्राएलाच्या कचाट्यात सापडले; इस्राएलाने त्यांचा संहार केला; त्यांच्यातला कोणी जिवंत राहिला नाही किंवा निसटून गेला नाही.
यहोशवा 8 वाचा
ऐका यहोशवा 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहोशवा 8:10-22
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ