YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 24:16-33

यहोशवा 24:16-33 MARVBSI

तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “परमेश्वराचा त्याग करून अन्य देवांची सेवा करणे आमच्या हातून कदापि न घडो; कारण आमचा देव परमेश्वर ह्यानेच आम्हांला व आमच्या पूर्वजांना मिसर देशातून, दास्यगृहांतून काढून आणले; त्यानेच आमच्या नजरेसमोर मोठमोठे चमत्कार केले आणि ज्या वाटेने आम्ही प्रवास केला आणि ज्या राष्ट्रांमधून आम्ही गेलो तेथे तेथे त्याने आमचे संरक्षण केले; आणि ह्या देशात राहणार्‍या अमोरी वगैरे सर्व लोकांना त्याने आमच्यापुढून घालवून दिले; आम्हीही परमेश्वराचीच सेवा करणार, कारण तोच आमचा देव आहे.” यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्हांला परमेश्वराची सेवा करवणार नाही, कारण तो पवित्र देव आहे; तो ईर्ष्यावान देव आहे; तो तुमच्या अपराधांची व पातकांची क्षमा करणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग करून परक्या देवांची सेवा कराल तर जरी त्याने तुमचे कल्याण केले असले तरी तो उलटून तुमचे अनिष्ट करील आणि तुमचा संहार करील.” लोक यहोशवाला म्हणाले, “नाही, आम्ही परमेश्वराचीच सेवा करणार.” यहोशवा लोकांना म्हणाला, “तुम्ही सेवेसाठी परमेश्वराला निवडले आहे, ह्याविषयी तुमचे तुम्हीच साक्षी आहात.” ते म्हणाले, “आम्हीच साक्षी आहोत.” यहोशवा म्हणाला, “आपल्यामधले परके देव तुम्ही टाकून द्या. आपले मन इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याकडे लावा.” लोक यहोशवाला म्हणाले, “आमचा देव परमेश्वर ह्याचीच आम्ही सेवा करणार आणि त्याचीच वाणी आम्ही ऐकणार.” तेव्हा यहोशवाने त्या दिवशी त्या लोकांबरोबर करार केला आणि शखेमात त्यांना विधी व नियम लावून दिले. ह्या गोष्टी यहोशवाने देवाच्या नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहून ठेवल्या आणि एक मोठी शिला घेऊन परमेश्वराच्या पवित्रस्थानाजवळील एका एला झाडाखाली ती उभी केली. यहोशवा सर्व लोकांना म्हणाला, “पाहा, ही शिला आपल्याविरुद्ध साक्षीदार होईल, कारण परमेश्वराने आम्हांला सांगितलेली सर्व वचने हिने ऐकली आहेत; एखाद्या वेळी तुम्ही परमेश्वराला नाकाराल म्हणून ही तुमच्याविरुद्ध साक्षीदार होईल.” मग यहोशवाने प्रत्येक माणसाला आपापल्या वतनाकडे रवाना केले. ह्या गोष्टी घडल्यानंतर परमेश्वराचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा आपल्या वयाच्या एकशे दहाव्या वर्षी मरण पावला. एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ-सेरह येथे त्याच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्याला मूठमाती दिली. यहोशवाच्या हयातीत आणि त्याच्या मरणानंतर जिवंत राहिलेल्या ज्या वडील लोकांना परमेश्वराने इस्राएलासाठी काय कार्ये केली हे माहीत होते त्यांच्या हयातीत इस्राएल लोकांनी परमेश्वराची सेवा केली. योसेफाच्या अस्थी इस्राएल लोकांनी मिसर देशातून आणल्या होत्या त्या शखेम येथे पुरल्या. ती जागा याकोबाने शखेमाचा बाप हमोर ह्याच्या वंशजांकडून शंभर कसीटा (एक चलन) देऊन विकत घेतली होती. हे ठिकाण योसेफाच्या वंशजांचे वतन झाले. नंतर अहरोनाचा मुलगा एलाजार हा मृत्यू पावला; त्याला त्यांनी एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात त्याचा मुलगा फिनहास ह्याला दिलेल्या गिबा गावी मूठमाती दिली.