मग एलाजार याजक, नूनाचा मुलगा यहोशवा व इस्राएल वंशांच्या पितृकुळांचे प्रमुख ह्यांच्याकडे लेवी वंशांतील पितृकुळांचे प्रमुख आले; ते कनान देशातील शिलो येथे येऊन म्हणाले, “आमच्या वस्तीसाठी नगरे आणि आमच्या जनावरांसाठी गायराने द्यावीत अशी आज्ञा परमेश्वराने मोशेच्या द्वारे केली होती.” त्यावरून इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपापल्या वतनातून लेव्यांना नगरे व गायराने दिली, ती येणेप्रमाणे : कहाथी कुळांची चिठ्ठी निघाली तेव्हा लेव्यांपैकी अहरोन याजकाच्या वंशजांना यहूदा, शिमोन व बन्यामीन ह्या वंशांच्या वाट्यांतून तेरा नगरे चिठ्ठ्या टाकून दिली. बाकीच्या कहाथी वंशजांना एफ्राईम वंशातील कुळांच्या वाट्यांतून, दान वंशाच्या वाट्यांतून आणि मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यांतून दहा नगरे चिठ्ठ्या टाकून दिली. गेर्षोन वंशजांना इस्साखार वंशांतील कुळांच्या आणि आशेर व नफताली ह्यांच्या वंशांच्या आणि बाशानातल्या मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वाट्यांतून तेरा नगरे चिठ्ठ्या टाकून दिली. मरारी वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे रऊबेन, गाद व जबुलून ह्यांच्या वंशांच्या वाट्यांपैकी बारा नगरे दिली. परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी लेव्यांना चिठ्ठ्या टाकून ही नगरे व त्यांची गायराने दिली. त्यांनी यहूदा व शिमोन ह्यांच्या वंशांची पुढे सांगितलेली नगरे दिली, ही नगरे लेवी वंशातील कहाथी कुळातल्या अहरोनाच्या वंशजांसाठी होती; कारण पहिली चिठ्ठी त्यांची निघाली. त्यांना त्यांनी यहूदातील डोंगराळ प्रदेशातले किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन हे नगर सभोवतालच्या गायरानांसह दिले; आर्बा हा अनाकाचा मूळ पुरुष होता; पण त्या नगराची शेती आणि त्याखालील खेडी ही यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला त्यांनी वतनादाखल दिली होती. अहरोन याजकाच्या वंशजांना, मनुष्यवध करणार्यांसाठी शरणपूर म्हणून नेमलेले हेब्रोन व त्याचे गायरान, ह्यांखेरीज लिब्ना व त्याचे गायरान, यत्तीर व त्याचे गायरान, एष्टमोवा व त्याचे गायरान, होलोन व त्याचे गायरान, दबीर व त्याचे गायरान, अईन व त्याचे गायरान, युट्टा व त्याचे गायरान, बेथ-शेमेश व त्याचे गायरान अशी एकंदर नऊ नगरे त्या दोन वंशांच्या वतनातून दिली. बन्यामीन वंशाच्या वतनातून गिबोन व त्याचे गायरान, गेबा व त्याचे गायरान, अनाथोथ व त्याचे गायरान आणि अलमोन व त्याचे गायरान अशी चार नगरे दिली. अशा प्रकारे अहरोन वंशांतील याजकांना तेरा नगरे व त्यांची गायराने मिळाली. बाकीच्या कहाथी वंशांतील लेव्यांना चिठ्ठी टाकून एफ्राईम वंशाच्या वतनातून नगरे दिली. मनुष्यवध करणार्यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील शखेम व त्याचे गायरान; ह्यांखेरीज गेजेर व त्याचे गायरान, किबसाईम व त्याचे गायरान आणि बेथ-होरोन व त्याचे गायरान अशी एकंदर चार नगरे त्यांना दिली. दान वंशाच्या वतनातून एल्तके व त्याचे गायरान, गिब्बथोन व त्याचे गायरान, अयालोन व त्याचे गायरान आणि गथ-रिम्मोन व त्याचे गायरान ही चार नगरे त्यांनी दिली. मनश्शेच्या अर्ध्या वंशाच्या वतनातून तानख व त्याचे गायरान आणि गथ-रिम्मोन व त्याचे गायरान ही दोन नगरे दिली. अशा प्रकारे बाकी राहिलेल्या कहाथी वंशजांच्या कुळांची अशी एकंदर दहा नगरे व त्यांची गायराने होती.
यहोशवा 21 वाचा
ऐका यहोशवा 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यहोशवा 21:1-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ