YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 2:1-14

यहोशवा 2:1-14 MARVBSI

नूनाचा मुलगा यहोशवा ह्याने गुप्तपणे दोन हेर शिट्टीम येथून पाठवले; त्याने त्यांना सांगितले की, “जा आणि तो देश व विशेषत: यरीहो हेरून या.” त्याप्रमाणे ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी उतरले. मग कोणी यरीहोच्या राजाला खबर दिली की, “काही इस्राएली लोक देशाचा भेद काढण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबेला निरोप पाठवला की, “जे पुरुष तुझ्याकडे येऊन तुझ्या घरात उतरले आहेत त्यांना बाहेर काढ; कारण सार्‍या देशाचा भेद काढण्यासाठी ते आले आहेत.” त्या दोघा पुरुषांना लपवून ती स्त्री म्हणाली, “माझ्याकडे कोणी पुरुष आले होते हे खरे, पण ते कोठले होते हे मला ठाऊक नाही. अंधार पडल्यावर वेस लावून घेण्याच्या वेळी ते निघून गेले; ते कोठे गेले ते मला ठाऊक नाही. तुम्ही लवकर त्यांचा पाठलाग करा म्हणजे त्यांना गाठाल.” पण तिने तर त्या माणसांना धाब्यावर नेऊन तेथे जवसाची ताटे पसरली होती त्यांत लपवून ठेवले होते. त्यांच्या मागावर निघालेले लोक यार्देनेकडे जाणार्‍या वाटेने उतारापर्यंत गेले; त्यांच्या मागावरील हे लोक गावाबाहेर पडताच वेस बंद करण्यात आली. इकडे हे हेर झोपी जाण्यापूर्वी ती स्त्री त्यांच्याकडे धाब्यावर गेली, आणि त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हांला दिला आहे. आम्हांला तुमची दहशत बसली आहे, आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला ठाऊक आहे; कारण तुम्ही मिसर देशाहून निघालात तेव्हा तुमच्यासमोर परमेश्वराने तांबड्या समुद्राचे पाणी कसे आटवले आणि यार्देनेपलीकडे राहणारे अमोर्‍यांचे दोन राजे सीहोन व ओग ह्यांचा तुम्ही कसा समूळ नाश केला हे आमच्या कानी आले आहे. हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जिवात जीव राहिला नाही; कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे. मी तुमच्यावर दया केली आहे म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या बापाच्या घराण्यावर दया करू; आणि ह्याबद्दल मला खात्रीलायक खूण द्या; तसेच तुझे आईबाप, भाऊबहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण वाचवू अशीही शपथ घ्या.” तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, “तुम्ही ही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ; आणि परमेश्वर आम्हांला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू.”