YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशवा 15:1-19

यहोशवा 15:1-19 MARVBSI

यहूदा वंशाला त्याच्या कुळांप्रमाणे चिठ्ठ्या टाकून जो भाग मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणेकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सरहद्दीपर्यंत पसरला होता. त्यांच्या दक्षिण सीमेस क्षार समुद्राच्या दक्षिणेकडील खाडीपासून आरंभ झाला; ती तशीच अक्रब्बीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे निघून सीन रानाच्या कडेने कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्रोनाजवळून अद्दारावरून जाऊन कर्काकडे वळली आहे; तेथून ती सीमा असमोनास जाऊन मिसरच्या नाल्यापर्यंत निघाली आहे; तिचा शेवट समुद्रानजीक झाला आहे; तुमची दक्षिण सीमा हीच. त्यांची पूर्व सीमा यार्देनेच्या मुखापर्यंतच्या क्षार समुद्राच्या किनार्‍यापर्यंत ठरली आहे. आणि उत्तर सीमा यार्देनेच्या मुखाजवळील समुद्राच्या खाडीपासून सुरू होऊन, बेथ-होग्लाच्या चढावावरून जाऊन बेथ-अराबाच्या उत्तरेकडे रऊबेनी बोहनच्या खडकापर्यंत गेली आहे; तेथून ती सीमा आखोर खोर्‍यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालाकडे वळली आहे; हे गिलगाल अदुम्मीमाच्या चढावासमोर नदीच्या दक्षिणेस आहे. मग ती सीमा एन-शेमेश नावाच्या झर्‍याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो. तेथून ती सीमा हिन्नोमपुत्राच्या खोर्‍यातून यबूसी चढणीच्या दक्षिण भागावर म्हणजे यरुशलेमेच्या चढणीवरून पश्‍चिमेकडे हिन्नोमाच्या खोर्‍यासमोर आणि रेफाईम खोर्‍याच्या उत्तर टोकास असलेल्या पहाडाच्या माथ्यावर गेली आहे; तेथून ती सीमा त्या पहाडाच्या माथ्यापासून नफ्तोहाच्या झर्‍यापर्यंत जाते व एफ्रोन डोंगरातील नगरांवरून निघून तेथून बाला उर्फ किर्याथ-यारीम येथपर्यंत पोहचते. तेथून ती सीमा बालापासून पश्‍चिमेस वळसा घेऊन सेईर डोंगरास पोचून यारीम उर्फ कसालोन डोंगराच्या उत्तर बाजूस जाऊन बेथ-शेमेश येथे उतरते व तशीच तिम्नाकडे निघते; तेथून ती सीमा एक्रोनच्या उत्तर भागावरून शिक्रोनपर्यंत गेली आहे आणि बाला पहाडावरून यबनेलास निघाली आहे; ह्या सीमेचा शेवट समुद्रतीरी होतो. पश्‍चिमेची सरहद्द महासमुद्राचा किनारा होय. यहूदा वंशाला त्यांच्या कुळांप्रमाणे जो विभाग मिळाला त्याच्या ह्या चतु:सीमा होत. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यफुन्नेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने यहूदाच्या वंशजांबरोबर वतन दिले तेच किर्याथ-आर्बा उर्फ हेब्रोन होय; हा अर्बा अनाक्यांचा मूळ पुरुष. कालेबाने शेशय, अहीमान व तलमय ह्या अनाकाच्या तीन वंशजांना तेथून घालवून दिले. तेथून त्याने दबीराच्या रहिवाशांवर हल्ला केला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते. कालेब म्हणाला, “जो कोणी लढून किर्याथ-सेफर काबीज करील त्याला मी आपली मुलगी अखसा देईन.” तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याने ते नगर घेतले; म्हणून कालेबाने आपली मुलगी अखसा त्याला दिली. ती आली तेव्हा आपल्या बापापासून काही मागून घेण्यासाठी तिने त्याला चिथावले. ती गाढवावरून उतरली1 तेव्हा कालेबाने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?” ती म्हणाली, “मला एक देणगी द्या; तुम्ही मला नेगेब दिले आहे, तेव्हा मला पाण्याचे झरेही द्या;” तेव्हा त्याने वरचे झरे आणि खालचे झरे तिला दिले.