YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योना 1:4-12

योना 1:4-12 MARVBSI

तेव्हा परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले; मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “अरे, झोप घेत काय पडलास? ऊठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही.” त्यांनी एकमेकांना म्हटले, “चला, आपण चिठ्ठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपल्यावर ओढवले हे आपल्याला कळेल.” त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला विचारले, “कोणामुळे हे संकट आमच्यावर आले सांग; तुझा धंदा काय? तू आलास कोठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस?” तो त्यांना म्हणाला, “मी इब्री आहे; ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे.” तेव्हा त्या माणसांना अत्यंत भीती वाटली; ते त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस?” तो परमेश्वरासमोरून पळून चालला आहे हे त्यांना कळले, कारण त्याने त्यांना तसे सांगितले होते. ते त्याला विचारू लागले की, “समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे?” समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. तो त्यांना म्हणाला, “मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल; कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुमच्यावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे.”