“आता तरी” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मनःपूर्वक माझ्याकडे वळा; उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा.”
आपली वस्त्रे नव्हे, तर हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे; अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे.
परमेश्वर तुमचा देव ह्याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्यामागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे; असे की जेणेकरून तुम्हांला त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल.
सीयोनात कर्णा वाजवा; उपासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा.
लोकांना जमवा. मंडळी शुद्ध करा; वडिलांना जमवा; मुले व स्तनपान करणारी अर्भके ह्यांनाही एकत्र करा; वर आपल्या खोलीतून व वधू आपल्या मंडपातून बाहेर येवोत.
देवडी व वेदी ह्यांच्यामध्ये याजक, परमेश्वराचे सेवक, रुदन करत म्हणोत, ‘हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर; आपल्या वतनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस; होऊ देशील तर राष्ट्रे त्याची निर्भर्त्सना करतील; ‘त्यांचा देव आता कोठे गेला’ असे राष्ट्रांनी का म्हणावे?”’
तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली, तो आपल्या लोकांविषयी कळवळला.
परमेश्वराने आपल्या लोकांची विनवणी ऐकून म्हटले : “पाहा, मी तुम्हांला धान्य, नवा द्राक्षारस व तेल पाठवून देतो, त्यांनी तुम्ही तृप्त व्हाल; ह्यापुढे राष्ट्रांमध्ये मी तुम्हांला निंदास्पद करणार नाही.
उत्तरेकडून आलेल्यास तुमच्यापासून घालवून रुक्ष व वैराण प्रदेशात हाकून देईन; त्याची आघाडी पूर्व-समुद्रात व पिछाडी पश्चिम-समुद्रात हाकून देईन; त्याचा दुर्गंध, त्याची घाण वर येईल; कारण त्याने उन्मत्तपणाची कृत्ये केली आहेत.
अगे भूमी, भिऊ नकोस; उल्लास व हर्ष कर, कारण परमेश्वराने महत्कृत्ये केली आहेत.
वनपशूंनो, भिऊ नका, कारण वनातली कुरणे हिरवी होत आहेत, झाडे फळे देत आहेत, अंजिराचे झाड व द्राक्षीचा वेल आपले सत्त्व देत आहेत.
सीयोनपुत्रहो, परमेश्वर तुमचा देव ह्याच्या ठायी उल्लास करा, हर्ष करा; कारण तुम्हांला हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस1 तो देतो; तो पहिली पर्जन्यवृष्टी म्हणजे आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो.
मग खळी गव्हाने भरून जातील, कुंडे नव्या द्राक्षारसाने व तेलाने उपळून जातील.
मी तुमच्यावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अधाशी टोळ व कुरतडणारे टोळ ह्यांनी ज्या वर्षांचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हांला भरपाई करून देईन.
तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल व ज्याने तुमच्यासाठी आश्चर्याची कृत्ये केली तो तुमचा देव परमेश्वर ह्याच्या नामाची स्तुती कराल; माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही.
तुम्ही समजाल की इस्राएल लोकांमध्ये मी आहे; मी परमेश्वर तुमचा देव आहे; अन्य कोणी नाही, व माझी प्रजा कधीही फजीत होणार नाही.
ह्यानंतर असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील.
तुमचे दास व दासी ह्यांच्यावरही त्या दिवसांत मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन.
मी आकाशात व पृथ्वीवर रक्त, अग्नी व धुराचे लोळ अशी चिन्हे दाखवीन.
परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.
तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करील तो तरेल; कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे निभावलेले सीयोन डोंगरावर व यरुशलेमेत राहतील आणि परमेश्वराने ज्यांना बोलावले ते बाकी उरलेल्यांत राहतील.