ईयोब 41
41
1“लिव्याथानास1 गळ घालून तुला ओढता येईल काय? दोरीने त्याची जीभ तुला दाबून धरता येईल काय?
2त्याच्या नाकात लव्हाळ्याची वेसण तुला घालता येईल काय? त्याच्या जबड्यात गळ रोवता येईल काय?
3तो तुझे आर्जव करीत राहील काय? तो तुला लाडीगोडी लावील काय?
4मी तुझा सतत दास होऊन राहीन, अशी आणभाक तो तुझ्याशी करील काय?
5लहान पक्ष्याशी खेळतात तसा तू त्याच्याशी खेळशील काय? त्याला बांधून तुझ्या कुमारीस तो खेळायला देशील काय?
6धीवरांचे संघ त्याचा व्यापार करतील काय? त्याला विभागून ते व्यापार्यांना2 देतील काय?
7त्याच्या कातडीत तू शूळ रोवशील काय? मासे मारण्याच्या बरच्या त्याच्या डोक्यात खुपसशील काय?
8तू त्याला हात लावून तर पाहा, ह्या झटापटीची आठवण तुला पक्की राहील; आणि पुन्हा तू तसे करणार नाहीस.
9पाहा, त्याला धरू पाहणार्याची आशा निष्फळ होते; त्याला पाहूनच एखादा गांगरून जाणार नाही काय?
10त्याला चिडवण्याचे धाडस कोणी करणार नाही; तर मग माझ्यासमोर टिकेल असा कोण आहे?
11मला कोणी प्रथम काही दिले आहे काय की मी त्याची फेड करू? अखिल नभोमंडळाखाली जे काही आहे ते माझे आहे.
12त्याचे अवयव, त्याचे महाबल, त्याचा सुंदर बांधा ह्यांविषयी बोलायचा मी राहणार नाही.
13त्याचे वरले आवरण कोणाला काढून घेता येईल? त्याच्या दाढांत कोणाला शिरकाव करता येईल?
14त्याच्या तोंडाची कवाडे कोणाला उघडता येतील? त्याचे दात चोहोकडून विक्राळ आहेत;
15त्याच्या खवल्याच्या रांगांचा त्याला अभिमान वाटतो; ती जशी काय परस्परांना जखडून टाकली आहेत.
16ती एकमेकांशी जडलेली आहेत; त्यांच्यामधून हवेचा प्रवेश होत नाही.
17ती एकमेकांशी जुळलेली व चिकटलेली आहेत; ती सुटी करता येत नाहीत.
18तो शिंकला म्हणजे प्रकाश चमकतो; त्याचे डोळे प्रभातनेत्रांसारखे आहेत.
19त्याच्या तोंडातून ज्वाळा निघतात, अग्नीच्या ठिणग्या उडतात.
20लव्हाळ्याच्या जाळावर उकळत ठेवलेल्या भांड्यांतून निघतो, तसा त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघतो.
21त्याच्या श्वासाने कोळसे पेट घेतात; त्याच्या तोंडातून अग्निज्वाला निघते.
22त्याच्या मानेत बळ असते; त्याच्यापुढे दहशत थयथय नाचत असते.
23त्याचे मांसल भाग दाट असतात; ते त्याच्या अंगात घट्ट बसलेले असतात, हलत नाहीत.
24त्याचा ऊर पाषाणासारखा कठीण आहे; जात्याच्या खालच्या तळीसारखा तो कणखर आहे.
25त्याने डोके वर केले की वीरही घाबरतात; भीतीने त्यांची गाळण उडते.
26कोणी त्याच्यावर तलवार चालवली तर ती त्याला लागत नाही; भाला, बरची, तीर ही काहीच त्याला लागत नाहीत.
27तो लोखंडाला कस्पटासमान, पितळेला कुजलेल्या लाकडासमान लेखतो.
28बाण त्याला पळवत नाही; गोफणगुंडे त्याला भुसासारखे लागतात.
29गदा तो कस्पटासमान लेखतो; परजणार्या भाल्याला तो हसतो.
30त्याच्या अंगाचे खालचे भाग तीक्ष्ण धारेच्या खापर्यांसारखे आहेत; तो चिखलांवर जसा काय कुळव फिरवतो.
31तो सागर रांजणासारखा घुसळतो; तो समुद्र मलमाच्या भांड्यासारखा करून सोडतो,
32तो आपल्यामागून पाण्याचा माग प्रकाशयुक्त करतो; तेव्हा सागर शुभ्र केशधार्यासारखा भासमान होतो.
33जन्मतःच भीतिविरहित असा भूतलावर त्याच्यासारखा कोणी नाही.
34तो उंच असलेल्या सर्वांकडे नजर लावण्यास भीत नाही; तो सर्व उन्मत्त पशूंचा राजा आहे.”
सध्या निवडलेले:
ईयोब 41: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.