मग परमेश्वराने वावटळीतून ईयोबाला उत्तर दिले; तो म्हणाला : “आता मर्दाप्रमाणे आपली कंबर बांध; मी तुला विचारतो, मला सांग. तू माझे न्याय्यत्व खोटे पाडू पाहतोस काय? आपण निर्दोषी ठरावे म्हणून तू मला दोषी ठरवतोस काय? देवाच्या भुजासारखा तुझा भुज आहे काय! त्याच्या वाणीप्रमाणे तुला गर्जना करता येते काय? तू आपणास महिमा व प्रताप ह्यांनी भूषित कर; तेज व ऐश्वर्य धारण कर. तुझ्या क्रोधाला भरते येऊ दे, आणि प्रत्येक गर्विष्ठाला पाहून त्याची मानखंडना कर. प्रत्येक गर्विष्ठाला पाहून त्याला खाली पाड आणि दुष्टाला जागच्या जागी तुडव. त्या सर्वांना मातीस मिळव; त्यांची तोंडे काळोखात राहतील असे त्यांना बांधून टाक. मग तुझा उजवा हात तुझा उद्धार करतो, अशी तुझी मीही प्रशंसा करीन. तुझ्याबरोबर निर्माण केलेल्या बेहेमोथास1 पाहा; तो बैलाप्रमाणे गवत खात असतो. पाहा, त्याच्या कंबरेत ताकद असते; त्याच्या पोटाच्या स्नायूंत सामर्थ्य असते. देवदारूच्या फांदीसारखे तो आपले शेपूट हलवतो; त्याच्या जांघांचे स्नायू एकमेकांशी जोडलेले असतात. त्याची हाडे जणू काय पितळेच्या नळ्या, त्याच्या फासळ्या जणू काय लोखंडाचे गज. तो देवाची प्रमुख कृती आहे; त्याच्या निर्माणकर्त्याने त्याला तलवारीने सज्ज केले आहे. डोंगर त्याला चारा पुरवतात; तेथे सर्व वनपशू क्रीडा करतात. तो कमलिनीखाली, लव्हाळ्याच्या बेटात व दलदलीत पडून राहतो. कमलिनी त्याच्यावर छाया करतात; ओहोळातले वाळुंज त्याला घेरतात. पाहा, नदीच्या पुराचा लोट त्यावर आला तरी तो डगमगत नाही; यार्देनेसारखा नदीचा प्रवाह झपाट्याने वाहून त्याच्या तोंडावर आदळला तरी तो निर्भय राहतो. तो सावध असता त्याला कोण धरील? पाशात पकडून त्याच्या नाकात वेसण कोण घालील?”
ईयोब 40 वाचा
ऐका ईयोब 40
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 40:6-24
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ